
पोलीस दल
नवख्यांकडे पोलिस ठाण्यांची धुरा!
लाच प्रकरणांनी बदनामी; सुधारणांसाठी हवा मोठा बदल
निवास चौगले : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : अनुभवी पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्षात, तर नवख्यांकडे पोलिस ठाण्यांचा भार, पोलिस निरीक्षक दर्जाच्या पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नियुक्ती, जनसंपर्काचा अभाव यांसारख्या कारणांनी अस्वस्थ असलेल्या पोलिस दलाची लाच प्रकरणाने पुन्हा एकदा बदनामी झाली आहे. अशा मानसिकतेने खचलेल्या पोलिस दलाला बाहेर काढण्यासाठी नेतृत्व खमके असण्याची गरज आहे.
जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचाऱ्याला लाच घेताना मध्यरात्री पकडल्यानंतर अनेक उत्कृष्ट कामगिरीमुळे उंचावलेली पोलिस दलाची मान शरमेने खाली गेली आहे. २०२१ पासून पोलिस दलातील तब्बल २६ पोलिस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले. गेल्यावर्षी पोलिस दलाचे नाक समजल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांना तब्बल १० लाख रुपयांची लाच घेताना अटक केलेली घटना विस्मृतीत जाण्यापूर्वीच कालच्या कारवाईने पुन्हा एकदा पोलिस दल चर्चेत आले आहे.
गेल्या दोन वर्षांत काही किचकट गुन्ह्यांचा तपास करून पोलिसांनी वाहव्वा मिळवली असली तरी सद्यस्थितीत पोलिस दलातच अंतर्गत अशी मोठी नाराजी आहे. आजरा, गडहिंग्लज, शहापूर, जयसिंगपूर, गगनबावडा ही पोलिस ठाणी पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी असताना या सर्व ठिकाणी सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. शहरात अनुभवी, डॅशिंग पोलिस अधिकाऱ्यांची गरज आहे. कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्था पाहणाऱ्या शहर वाहतूक शाखेला पोलिस निरीक्षक नाही. या विभागाचा कार्यभार सध्या फौजदार दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे. पोलिस उपअधीक्षक दर्जाचे काही अनुभव अधिकारी आहेत; पण त्यांच्याशी चर्चा होते की नाही यावरच प्रश्नचिन्ह आहे.
नियंत्रण कक्षात सध्या चार ते पाच पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी ‘ड्यूटी’ करत आहेत. यांपैकी काही पोलिस निरीक्षकांनी यापूर्वी काम केलेल्या ठिकाणची कामगिरी गाजलेली आहे; पण तेच कर्मचारी सकाळी दहा वाजता नियंत्रण कक्षात येतात, दिवसभर बसतात आणि सायंकाळी घरी निघून जातात. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा कमी झालेला जनसंपर्क हाही पोलिस दलात चर्चेचा विषय आहे. घर ते कार्यालय आणि मोठ्या घटनांवेळी दिलेल्या भेटी वगळता हे अधिकारी बाहेर अपवादानेच दिसले आहेत. या सर्वांचा परिणाम पोलिस दलाच्या कामगिरीवर होतो. त्यातून लाच स्वीकारण्याच्या घडलेल्या घटनांमुळे पोलिस दलातील ही अस्वस्थता कायम पाहायला मिळत आहे.
----------------
जानेवारी २०२२ पासूनच्या कारवाया
खाते*कारवाई*लाच प्रकरणात आरोपी
पोलिस*८*१०
महसूल*२*३
आरोग्य*३*३
उद्योग व ऊर्जा*१*१
ग्रामविकास*१*२
कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका*४*८
शिक्षण*२*२
इतर लोकसेवक*२*२
एकूण कारवाई*२३*३१.