आंतरविद्यापीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरविद्यापीठ
आंतरविद्यापीठ

आंतरविद्यापीठ

sakal_logo
By

88839

मुंबई, नागपूर, नांदेड, जळगाव विजयी
आंतरविद्यापीठ कर्मचारी टी-२० क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ; शिवाजी विद्यापीठाला यजमानपद

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः शिवाजी विद्यापीठात अखिल महाराष्ट्र आंतरविद्यापीठ कर्मचारी टी-२० कुलगुरू चषक लेदरबॉल स्पर्धेचा आजपासून प्रारंभ झाला. त्यात मुंबई विद्यापीठाने सात गडी राखून नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठावर मात करीत विजयी सलामी दिली, तर नागपूर, नांदेड आणि जळगाव विद्यापीठाच्या संघांनीही प्रतिस्पर्धी संघांवर मात करत बाजी मारली.

येथील क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानाचे पूजन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते झाले. पुण्याच्या सीमाशुल्क व केंद्रीय जीएसटी विभागाचे अधीक्षक तथा माजी रणजीपटू अतुल गायकवाड यांच्या हस्ते पहिल्या सामन्याची नाणेफेक करण्यात आली. या सलामीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नागपूर विद्यापीठाने २० षटकांत सात बाद १३१ धावा केल्या. उत्तरादाखल मुंबई विद्यापीठाने सात गडी राखून १६.४ षटकांत १३३ धावा करीत विजय मिळविला. १४ धावा करणारे आणि तीन बळी घेणारे मुंबई विद्यापीठाचे विपुल खंडारे सामनावीर ठरले.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठावर विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना लोणेरे संघाने १३.५ षटकात सर्व बाद ९७ धावा केल्या. नांदेड संघाने प्रत्युत्तरादाखल १३.२ षटकात ६ बाद ९८ धावा केल्या. चार बळी घेणारे नांदेडचे जयराम हंबर्डे सामनावीर ठरले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ९ गडी राखून नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठावर मात केली. नाशिकच्या संघाने १८.१ षटकात १० बाद ७५ धावा केल्या. पुणे संघाने फलंदाजी करताना ७.३ षटकात अवघा एक गडी गमावून ७७ धावा केल्या. सामन्यात ३५ धावा करून गोलंदाजीतही ३ बळी मिळविण्याची अष्टपैलू कामगिरी करणारे मनिष गायकवाड सामनावीर ठरले. जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सहा धावांनी यजमान शिवाजी विद्यापीठाला पराभवाचा धक्का दिला. जळगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल शिवाजी विद्यापीठ संघ २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १७७ धावांपर्यंत मजल मारू शकला. जळगावचे जितेंद्र पाटील सामनावीर ठरले.
दरम्यान, या स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी गायकवाड म्हणाले, की शिवाजी विद्यापीठामुळेच आम्ही क्रिकेटमध्ये आणि पुढे आयुष्यातही चांगली कारकीर्द घडवू शकलो. विद्यापीठाचे आम्हा खेळाडूंच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, की या स्पर्धेत पारंपरिक विद्यापीठांच्या बरोबरीनेच आरोग्यविज्ञान, अभियांत्रिकी, पशुविज्ञान व मुक्त विद्यापीठेही सहभागी झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या विद्यापीठांचे प्रतिनिधित्व येथे दिसते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित संघांनी संचलन करीत ध्वजासह सलामी दिली. शिवाजी विद्यापीठ संघाचे कर्णधार रमेश ढोणुक्षे यांनी उपस्थित संघांना शपथ दिली. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, सेवक संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले उपस्थित होते. डॉ. शरद बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. अभिजित लिंग्रस यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले.

चौकट
‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान विकसित करावे’
गायकवाड म्हणाले, की शिवाजी विद्यापीठात आम्ही विद्यार्थिदशेत सरावासाठी सतत मैदानावरच असायचो. त्या वेळी येथील कर्मचारी बंधूंनी आम्हाला खूप सहकार्य केले. या अथक सरावामुळेच पुढे जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद या गोलंदाजांची कधी भीतीच वाटली नाही. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदानही विकसित करावे.