
मासेवाडी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
मासेवाडी ग्रामस्थांचा
आंदोलनाचा इशारा
दुगूनवाडी, ता. १४ : मासेवाडी (ता.गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी महागाव ते दुगूनवाडी या दहा वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कक्षेत येत असल्याने निधी अभावी या जास्त वर्दळीच्या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे दूर्लक्ष झाले आहे.
मासेवाडी येथील चाळोबा मंदिर ओढ्यापासून दुगूनवाडीपर्यंत पूर्ण रस्ता उखडला आहे. परिसरातील नागरिक व वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच या गावाची २ ते ४ मे दरम्यान महालक्ष्मीची यात्रा होणार आहे. यात्रेतील भाविकांची संभाव्य गर्दी व रस्त्यामुळे वाहतुकीचा ताण लक्षात घेता या रस्त्याचे ताबडतोब खडीकरण व डांबरीकरण व्हावे, या हेतूने मासेवाडी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या गडहिंग्लजचे उपअभियंत्यांना निवेदन दिले आहे. २० मार्चपर्यंत रस्त्याबाबत हालचाली न झाल्यास त्यानंतर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.