मैल खड्ड्यातील विषारी धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैल खड्ड्यातील विषारी धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
मैल खड्ड्यातील विषारी धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मैल खड्ड्यातील विषारी धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

sakal_logo
By

ich146.jpg
89103
इचलकरंजी : मैल खड्ड्यास लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात विषारी धूर बाहेर पडत आहे.

मैल खड्ड्यातील विषारी धुराने
नागरिकांचे आरोग्य धोक्यात

आमदार, इचलकरंजी महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्षाचा ''आप''चा आरोप

इचलकरंजी, ता. १७ : इचलकरंजी शहरातील सांगली नाका परिसरात असणाऱ्या कचरा डेपोला वारंवार आग लावली जात असल्याने गुलमोहर कॉलनी, सांगली नाका, शिक्षक कॉलनी, आसरानगर, वृंदावन कॉलनी, सुरभी कॉलनी, निशिगंध हौसिंग सोसायटी व परिसरात विषारी धुराचे साम्राज्य पसरले आहे. स्थानिकांनी आमदार व महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत आम आदमी पक्षाच्या वतीने निषेध केला.
इचलकरंजी महापालिका प्रशासन एकीकडे स्वच्छ इचलकरंजी, सुंदर इचलकरंजी, माझी वसुंधरा असे स्वच्छता अभियान राबवत असताना मैल खड्ड्याबाबत उदासीनता दिसून येते. मैल खड्ड्यास वारंवार लागणाऱ्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना जगणे मुश्कील बनले आहे. आगीमुळे निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही आमदार व महापालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
आमदार प्रकाश आवाडे यांनी आसरानगर येथे एका कार्यक्रमात एक महिन्यात सांगली नाका परिसरातील कचरा डेपो स्वच्छ करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याला पाच महिने झाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळसुद्धा कचरा डेपोच्या प्रदूषणप्रश्नी बघ्याची भूमिका घेत आहे. कचरा डेपो केवळ राजकारणाचा मुद्दा बनला असून, विषारी धुराचा नागरिकांना त्रास होत असूनही आरोग्यासंदर्भात प्रशासनाला देणेघेणे नसल्याचे दिसत असल्याचा आरोप करीत ‘आप’कडून निषेध केला. ‘आप’चे जिल्हा युवा उपाध्यक्ष अभिषेक पाटील, लक्ष्मण पारसे, अरिहंत उपाध्ये, मनोज पाटील, मलगोंडा भोजकर, अब्दुल बसताडे, श्रीपाल दरिबे आदी उपस्थित होते.
-----------------
महापालिका प्रशासनाकडून मैल खड्ड्यावर लागलेली आग विझवण्याचे काम तत्काळ होत असते. तसेच शासन स्तरावर जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यास लवकरच निधी मंजूर होईल. प्रश्‍न मार्गी लागेल.
-सुनीलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका