
प्रकल्पग्रस्तांची बैठक रद्द
प्रकल्पग्रस्तांची बैठक रद्द
डॉ. पाटणकर ठरवणार आज आंदोलनाची दिशा
कोल्हापूर, ता. १४ : प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडण्याचे काम शासन आणि प्रशासनाकडून झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपासमार सहन करत आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची आजची बैठक रद्द झाल्याने धरणग्रस्तांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर उद्या (ता. १५) दुपारी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मारुती पाटील यांनी दिली.
प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली जाणार होती. अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली होती. बैठकीसाठी आवश्यक सर्व माहिती कागदपत्रे तयार ठेवली होती. मात्र ऐनवेळेला ही बैठक रद्द केली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांकडून खंत व्यक्त करण्यात आली. दरम्यान, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हलणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. आंदोलनाची दखल घेतली जात नसेल तर आंदोलन अधिक उग्र करावे लागेल. शासनाला प्रकल्पग्रस्तांची ताकद दाखवून द्यावी लागेल. आजची रद्द केलेल्या बैठकीबद्दल डॉ. पाटणकर यांना माहिती दिली जाईल. त्यामुळे उद्या (ता. १५) डॉ. पाटणकर आल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवतील, असेही पाटील यांनी सांगितले.