
संक्षिप्त पट्टा-२
89156
संभाजीनगरात विविध धार्मिक कार्यक्रम
कोल्हापूर ः संभाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ मगरमठीतर्फे आजपासून श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन सोहळ्याला प्रारंभ झाला. तेवीस मार्चपर्यंत हा उत्सव होणार असून, विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. आज उत्सवाच्या पहिल्या दिवशी वामन रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा संदीप खोत व अभिजित सूर्यवंशी यांनी बांधली. गेल्या पस्तीस वर्षांपासून मगरमठी येथे स्वामी प्रगट दिनाचे आयोजन केले जाते. आजपासून दररोज श्रीस्वामींची विविध रूपातील पूजा, सहस्र नामावली, भजने, लघुरुद्र, अभिषेक आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवारी (ता. २२) सायंकाळी पाच वाजता मिरजकर तिकटी येथून पालखीचे प्रस्थान होईल. गुरुवारी (ता. २३) दुपारी १२ वाजता मगरमठी संभाजीनगर येथे महाप्रसादाचे आयोजन होणार आहे.
...............
89149
डिंपल गजवाणी-हिडदुगी यांना पुरस्कार
कोल्हापूर ः पुणे येथील महाएनजीओ फेडरेशनतर्फे आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल येथील डिंपल गजवाणी-हिडदुगी यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरवण्यात आले. पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते वितरण झाले. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष शेखर मुंदडा, भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा व माजी आमदार मेधा कुलकर्णी, अक्षय महाराज भोसले, मुकुंद शिंदे उपस्थित होते. डिंपल गजवाणी-हिडदुगी २००३ पासून आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. ‘तणावमुक्त हिंसामुक्त समाज’ चळवळीच्या माध्यमातून त्यांनी जगभरातील विविध ठिकाणी दोन हजारांहून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत.
............
अंबाबाई ते जोतिबा खेट्याला प्रतिसाद
कोल्हापूर ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर ते जोतिबा मंदिर या पायी खेट्याला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अडीचशेहून अधिक लोक या उपक्रमात सहभागी झाले होते. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या उपस्थितीत उपक्रमाला प्रारंभ झाला. सुशील कोरडे, दिलीप देसाई, कल्लाप्पाण्णा पत्रावळे, धोंडिराम चोपडे, परशुराम नांदवडेकर, अजित मोरे, महिपती संकपाळ, बाळासाहेब भोगम, राजश्री नांदवडेकर, देवेंद्र रासकर, उदय गायकवाड, डॉ. पल्लवी मूग आदींनी संयोजन केले.