
संपातील कर्मचारी संख्या वाढली
जिल्हा परिषद ...
...
संपातील कर्मचारी संख्या वाढली
कोल्हापूर, ता.१५: जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी सुरु असलेल्या कर्मचारी संपातून शिक्षक संघाने माघार घेतली. अशा फुटीचा संपावर परिणाम होवू नये म्हणून आज कर्मचारी संघटना अधिक आक्रमक झालेल्या पहायला मिळाल्या. जिल्हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शासनाच्या आदेशाची होळी केली. तसेच चोरुन अधिकाऱ्यांच्या मदतीला धावणाऱ्या, कमिशनची कामे करण्यासाठी धावाधाव करणाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. तसेच ज्या शिक्षकांनी पहिल्या दिवशी कामावर हजेरी लावली, त्यातील अनेक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशीच्या आंदोलनात सहभागी करुन घेण्यात संघटनांना यश आले.
जिल्हा परिषदेच्या संपात पहिल्या दिवशी ७ हजार १२५ कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. तर संघटनेने दुसऱ्या दिवशी कडक भूमिका घेतल्याने संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दुसऱ्या दिवशी ७ हजार ३११ इतकी झाली आहे. मंगळवारी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १८६ इतकी वाढली आहे. तरीही संपात सहभागी न होता कामावर हजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजार २४४ इतकी आहे. दरम्यान, राजपत्रित संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने आज जिल्हा परिषदेच्या खाते प्रमुखांनी आंदोलकांची भेट घेवून, सोबत असल्याचे स्पष्ट केले. राजपत्रित अधिकारी संघटनेनेही २८ मार्चनंतर या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. सध्या शासकीय कार्यालयात जी काही हालचाल सुरु आहे, ती या अधिकाऱ्यांमुळे दिसत आहे. जर हे अधिकारी आंदोलनात सहभागी झाले तर मात्र परिस्थिती अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत. अधिकारी संपावर गेले तर शासकीय कार्यालयीन कामकाज कोलमडून जाणार आहे.