
जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस उत्तर
दडपशाहीला घाबरू नका
लवेकर ः ...अन्यथा सीपीआरमध्ये ठिय्या आंदोलन करू
कोल्हापूर, ता. १५ : ‘जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या नोटिशीला उत्तर देऊ नका, कोणी कितीही दडपशाही करू देत, आता आर या पारची लढाई लढली जाईल. तसेच सीपीआरच्या अधिष्ठातांनी कर्मचाऱ्यांना वेडेवाकडे बोल सुनावल्यास टाऊन हॉलऐवजी सीपीआरमध्ये ठिय्या आंदोलन केले जाईल’, असा इशारा शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी आज दिला. टाऊन हॉल येथे झालेल्या ठिय्या आंदोलनावेळी ते बोलत होते.
लवेकर म्हणाले, ‘सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी ४८ तासांत कामावर हजर राहावे, अशा सूचना दिल्या आहेत. अनेक कर्मचाऱ्यांच्या व्हॉटसॲप नंबरवरही या नोटिसा आल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत सरकार जुनी पेन्शन लागू करत नाही, तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राला उत्तर देऊ नका. कोणी काहीही कारवाई करू देत, पण आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी वारंवार मागणी केली जात आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थिती कर्मचाऱ्यांवर कोणीही दमदाटी करू नये. तसेच सीपीआरमधील १३ स्टाफ सिस्टरची रजा रद्द केली आहे. त्यांना कामावर हजर राहण्यास सांगितले. या कर्मचाऱ्यांनी कामावर आलो तरी संपात सहभाग घेणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्यावर कारवाई करू असे सांगितले. मात्र, अधिष्ठातांनी कर्मचाऱ्यांवर दडपशाही केल्यास उद्यापासून सीपीआरच्या आवारात वीस हजार कर्मचारी ठिय्या मारून बसतील, असाही इशारा यावेळी लवेकर यांनी दिला.
यावेळी, खासगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, नर्सिंग फेडरेशनच्या हशमत हावेरी, संजीवनी दळवी, श्रीमंती पाटील, परिचारिका संघटना, लातूर जिल्हा शाखेचे योगेश यादव, मनुजा रेनके, मानसी मुळे, संजय क्षीरसागर उपस्थित होते.