
बावडा जलशुद्धीकरण केंद्र
89517
४० लाख लिटर शुद्ध पाणी वाया
कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रातील चित्र; नागरी कृती समितीने केले उघड
कोल्हापूर, ता. १६ ः महापालिकेच्या कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज ४० लाख लिटर शुद्ध पाणी वाया जात असल्याची बाब आज नागरी कृती समितीने उघड केली. दोन वर्षापेक्षा जास्त काळापासून असलेल्या गळतीसाठी जलअभियंता कारणीभूत आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणीही समितीने केली.
शहरात पाणी मिळत नसल्याने नागरिकांकडून आंदोलने केली जात आहेत. दुसरीकडे गळती दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा विभागाकडून हालचाल केली जात नाही. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शाखा अभियंत्यांची बैठक घेऊन गळती शोधून काढून दुरूस्त करा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर समितीचे आर. के. पोवार, ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे यांन बावडा जलशुद्धीकरण केंद्राला गुरुवारी भेट दिली. या केंद्रातून निम्म्या ई वॉर्डाला पाणीपुरवठा होतो. येथून तीन ते चार वर्षे ४० लाख लिटर शुद्ध पाणी वाहून जात असल्याचा प्रकार उघडकीस आणला. तांत्रिक विभागाचे सहायक अभियंता जयेश जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. दोन वर्षे दिवसाला ४० लाख लिटर पाणी वाहून जात असल्याचे कबूल केले. ॲड. इंदुलकर म्हणाले, ‘‘जलअभियंत्यांना माहिती नसताना पाणीपुरवठ्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. ही गळती प्रशासकांच्या निदर्शनास आणून दिली नाही, दुरुस्ती केली नसल्याबद्दल त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे.’
चौकट
पुनर्वापर करण्याचे तात्पुरते नियोजन
जलशुध्दीरकण केंद्रातील पाणी साठवणुकीच्या दगडी बांधकामाचा संप महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने १९७२ मध्ये बांधला आहे. १२ वर्षापूर्वी स्वनिधीतून दुरुस्तीचे व गाळ काढण्याचे काम केले आहे. त्यावेळी पाणी गळती थांबविली होती. हा संप जुना असल्याने अमृत पहिला टप्प्यातून नवीन बांधण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. लवकरच उर्वरित काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर जुना संप वापरणे बंद केले जाणार आहे. ५ ते ६ वर्षापासून संपाच्या तळातून, भिंतीतील गळतीचे पाणी एकत्रित करून पुन्हा पंपाने उचलून रिसायकल संपामध्ये टाकण्यात येते. या पाण्याचा पुर्नवापर करण्याचे तात्पुरते नियोजन केल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.