
jsp161aci_txt.txt
89393
जयसिंगपूरः गुरुवारी पहाटेच्या अवकाळीने जमीनदोस्त झालेले शाळू पीक.
...
जयसिंगपूर परिसरात अवकाळी पाऊस
शाळू पिकाचे मोठे नुकसानः नुकसान भरपाईची मागणी
जयसिंगपूर,ता.१६ः शहरात गुरुवारी पहाटे ढगांच्या गडगडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने परिसरातील शाळू पिकाचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेले पिक हातातून निघून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळणार का, पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने नुकसानीचे पंचनामे होणार का, असे अनेक प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून विचारले जात आहेत.
गुरुवारी पहाटे विजांच्या कडकडाने मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह तासभर झालेल्या पावसाने काढणीला आलेले शाळू पीक जमीनदोस्त झाले. काही ठिकाणी काढणीला आलेल्या तर काही ठिकाणी पोटरी पडलेल्या अशा दोन्ही पिकांचे नुकसान झाले. अडीच-तीन महिन्यांचे हे पीक चार ते पाच फुटांवर वाढले असल्याने वाऱ्याचा फटका शाळू पिकाला बसला. पावसाने पिक भिजल्याने शिवाय जमीनदोस्त झाल्याने हे पिक आता जनावरांच्या चाऱ्यासाठी विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. गुंठ्याला केवळ हजार रुपये घेऊन भिजलेले पिक चाऱ्यासाठी विकावे लागणार आहे. हातातोंडाला आलेले पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी नाही की चांगला चाराही नाही अशी स्थिती शाळू उत्पादक शेतकऱ्यांची बनली आहे. यामुळे पावसाळ्यात चाऱ्यासाठी वणवण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.
...
‘माझ्या दीड एकर शेतीतील शाळू पिकाचे नुकसान झाले आहे. किमान १५ ते १८ क्विंटल ज्वारीचे उत्पादन अपेक्षित होते. शिवाय पावसाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचीही सोय होणार होती. मात्र अवकाळीने हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. बी-बियाणे, मशागत, मजूर, रासायनिक खते, औषधे यावर २५ ते ३० हजार रुपये खर्च केले आहेत. नैसर्गिक आपत्तीचा फटका लक्षात घेऊन शासनाकडून भरपाईची अपेक्षा आहे.
संदीप खामकर, शेतकरी, जयसिंगपूर
....
....
कागल परिसराला झोडपले
कागल : गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने कागल शहर आणि परिसराला झोडपून काढले. पावसाबरोबरच विजांनी थैमान घातले. बराच काळ कोसळलेल्या पावसाने शहरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. गटारी तुडूंब भरून वाहू लागल्या. या पावसाने हातातोंडाशी आलेल्या शाळू पिकाचे नुकसान केले.