सावधान, पाणी साठ्यात होतेय घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान, पाणी साठ्यात होतेय घट
सावधान, पाणी साठ्यात होतेय घट

सावधान, पाणी साठ्यात होतेय घट

sakal_logo
By

सावधान, पाणी साठ्यात होतेय घट
चित्री मध्यम प्रकल्प : पाणी जपून वापरण्याचे पाटबंधारेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : आजरा व गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरणाऱ्‍या चित्री मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा आजच्या दिवशी १२ टक्क्यांनी कमी आहे. ऑक्टोबरनंतर न झालेला परतीचा पाऊस आणि यंदा वळीव नसल्याने ही घट झाल्याचे सांगण्यात आले. पाणी साठ्यात घट होत असल्याने जूनपर्यंत पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाटबंधारे खात्याने केले आहे.
चित्री प्रकल्पामध्ये आजचा पाठीसाठा १०९५ एमसीएफटी म्हणजेच ५८ टक्के इतका आहे. गतवर्षी याचवेळी ६८ ते ७० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. दहा ते बारा टक्क्यांनी यंदा कमी झालेल्या पाणीसाठ्याने चिंता वाढवली आहे. आता २२ मार्चपासून तिसरे आवर्तन सुरु होणार आहे. पहिल्या आवर्तनाला २६० तर दुसऱ्‍या आवर्तनासाठी ३०० एमसीएफटी पाणी लागले आहे. आता उन्हाळा वाढल्याने तिसऱ्या आवर्तनाला यापेक्षा जास्त पाणी लागण्याची शक्यता आहे. अजून एप्रिल व मे अशी दोन आवर्तने सोडावी लागणार आहेत. दरम्यान, गतवर्षी जूनमध्ये प्रकल्पात ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. इतका साठा आता शिल्लक राहणे मुश्किल आहे. कमीतकमी १५ ते २० टक्के पाणी यंदाच्या जूनपर्यंत शिल्लक राहण्याचा अंदाज आहे.
गतवर्षी ऑक्टोबरनंतर परतीचा पाऊस कमी झाला. यामुळे जमिनीला वापसा लवकर आला. नवीन ऊस लागवड आणि रब्बी हंगामासाठी पाण्याचा वापर झाल्याने बंधाऱ्‍यामध्ये पावसाचे साठवलेले पाणी जानेवारीपर्यंतच पुरले. यामुळे यंदा जानेवारीतच चित्रीतील पहिले आवर्तन सोडावे लागले. त्यातच अजून वळीव पावसाचा पत्ता नाही. उन्हाच्या झळासुद्धा वाढत आहेत. यामुळे उसासह इतर पिकांना पाण्याची गरज अधिक भासत आहे. भविष्याच्यादृष्टीने प्रकल्पात पिण्यासाठीचा राखीव साठाही शिल्लक ठेवावा लागणार आहे. यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे. यावर्षी उपसाबंदीची शक्यता कमी असली तरी आवश्यक असेल तरच पिकांना देण्याचे आवाहन पाटबंधारेने केले आहे.
----------------------------
* आंबेओहोळ-यरंडोळचा सपोर्ट
चित्रीमधील पाणीसाठा कमी होत असला तरी पाटबंधारेसमोर आंबेओहोळ व यरंडोळ प्रकल्पातील पाणीसाठ्याचा सपोर्ट घेण्याचा पर्याय आहे. ऐनवेळी या प्रकल्पांमधील पाणीसाठा वापरण्याचे नियोजन पाटबंधारेला करावे लागणार आहे. यामुळे पाणी कमी पडणार नसले तरी नागरिक व शेतकऱ्‍यांनी पाणी वापरण्यात काटकसर करण्याची गरज आहे.