
इन्फल्युएंझासाठी हवी खबरदारी
जिल्हा परिषद ... लोगो
...
फ्ल्यूच्या साथीबाबत आरोग्य विभाग ‘सतर्क’
रुग्णसंख्या चालली वाढत; सर्वेक्षणाच्या कामात अडचणी
कोल्हापूर, ता. १६: इन्फ्ल्यूएंझा (फ्ल्यू) एच १ एन १ या आजाराचे राज्यासह जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. लवकर निदान व लवकर उपचार केले तर इन्फ्ल्यूएंझाचा पुढील धोका टाळणे शक्य आहे. वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या प्रकारचे याच आजाराचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात फ्ल्यूसदृश्य रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सरकारी कर्मचारी संपावर असल्याने या सर्वेक्षणात अडचणी येत आहेत. तरीही आरोग्य विभाग उपकेंद्रांच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्वेक्षण करण्याचे नियोजन करत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांनी सांगितले.
फ्ल्यू सदृश्य आजाराचे रुग्ण असतील तर त्यातील सौम्य रुग्णांवर ( अ गटातील ) लक्षणानुसार उपचार करणे, त्यांच्या सहवासितांचा शोध व उपचार करण्यासाठी उपकेंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील तसेच सर्व आरोग्य संस्थामध्ये फ्ल्यू सर्वेक्षणाचे काम नियमितपणे करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. फ्ल्यूसदृश्य रुग्णामध्ये ज्यांना ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी अशी काही लक्षणे असल्यास त्याच्यावरती फ्ल्यूचे उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर बालरुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरुपाचा ताप, घसादुखी तसेच बाळाच्या तोंडातून अतिप्रमाणात लाळ गळणे, ही लक्षणे आढळून येत आहेत. त्यांच्यावरील दिलेल्या सूचनेप्रमाणे उपाचार करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.
स्वाईन फ्ल्यूसहीत इतर कोणत्याही संसर्गजन्य आजाराच्या साथीला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी कार्यक्षेत्रातील ५० आणि १०० खाटांची उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, अति विशेषज्ज्ञ रुग्णालये, संसर्गजन्य आजार नियंत्रण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालये या ठिकाणी स्वाईन फ्ल्यू रुग्णांच्या प्रयोगशाळा, नमुने संकलन आणि उपचाराची सुविधा उपलब्ध ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित स्वाईन फ्ल्यू रुग्णांचे प्रयोगशाळा नमुने घेणे, बाधित रुग्णांवर उपचार करणे आणि गंभीर स्वरूप धारण केलेल्या रुग्णांना रुग्णालयांकडे सुव्यवस्थितपणे संदर्भीत करण्याची जबाबदारीही काही निवडक रुग्णालयांकडे देण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.