
कोरोनाची रुग्णसंख्या चालली वाढत
जिल्ह्यात वाढतेय कोरोनाची रुग्णसंख्या
कोल्हापूर, ता. १७ : जिल्ह्यात आठवड्याभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. ही संख्या आता दोन आकड्यात पोहोचली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
कोरोना व तत्सम आजारांचे रुग्ण वाढत आहेत. फ्लूची रुग्णसंख्याही वाढत आहे. संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाकडून नवनवीन सूचना देण्यात येत आहेत. मात्र, या सर्वांची अंमलबजावणीत संपाचा अडथळा ठरत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात आरोग्य विभागाचे अनेक कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत आहेत. जे रुग्ण उपाचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येत आहेत, त्यांच्यावरच फक्त उपचार होत आहेत. मात्र, संपर्कातील बाधितांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना तसेच फ्लूची रुग्णसंख्या वाढू नये यासाठी सर्वांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. तसेच ताप, थंडी, खोकला अशी लक्षणे असतील तर तत्काळ उपचार तसेच संपर्कातील व्यक्तींचीही तपासणी करणे आवश्यक आहे. वेळीच उपचार झाला तर पुढील संकट टळणार आहे. त्यामुळे लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी थेट आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे.