लेटकमर्सना बसणार चाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेटकमर्सना बसणार चाप
लेटकमर्सना बसणार चाप

लेटकमर्सना बसणार चाप

sakal_logo
By

89809
89808
------------

लेटकमर्सना बसणार चाप

सफाई कर्मचाऱ्यांचीही ऑनलाईन हजेरी; इचलकरंजी मनपाकडून नवीन २५ बायोमेट्रिक मशिन्स कार्यान्वित

इचलकरंजी, ता. १७ ः महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना आता अधिक शिस्त लागणार आहे. प्रत्येक वॉर्डात एक याप्रमाणे नवीन २५ बायोमेट्रिक हजेरीची मशिन्स कार्यान्वित केली आहेत. त्यामुळे लेटकमर्सना चाप बसणार असून, यापुढे वेळेत उपस्थित राहण्याची दक्षता सफाई कर्मचाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. याशिवाय हजेरीची दोनवेळा नोंद होणार असल्याने नियुक्त केलेल्या वॉर्डातच सफाई कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून येणार आहे. एकूणच कार्यालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे आता सफाई कर्मचाऱ्यांनाही वेळेची शिस्त पाळावी लागणार आहे.
सध्या महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत बायोमेट्रिक हजेरीची नोंद केली जाते. त्यामुळे बहुतांशी कार्यालयीन कर्मचारी वेळेवर येण्यासाठी धडपडत असतात. उशिरा आल्यास गैरहजर असल्याची नोंद होते. त्यामुळे हजेरीबाबत कार्यालयीन कर्मचारी दक्ष असल्याचे दिसून येत आहे. आता पुढील टप्पा म्हणून सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यासाठी आज आरोग्य विभागातून एकूण २५ बायोमेट्रिक मशिन वितरित केली आहेत. संबंधित वॉर्डातील ऑफलाईन हजेरी घेण्यात येत असलेल्या ठिकाणीच या मशिनरी बसवण्यात येणार आहेत. तेथे येऊन सफाई कर्मचाऱ्यांना वेळेत बायोमेट्रिक मशिनवर हजेरी नोंदवावी लागणार आहे. त्यानंतर कामाचा कालावधी संपल्यानंतर घरी जातानाही पुन्हा बायोमेट्रिक हजेरीची नोंद करावी लागणार आहे.
नवीन यंत्रणेमुळे सफाई कर्मचाऱ्यांना वेळेत उपस्थित राहावे लागणार आहे. वेळी-अवेळी येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वागणुकीला यामुळे चाप बसणार आहे. अनेक कामगार सकाळी काम केल्यानंतर घरी निघून जातात. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशीच कामावर येत असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी होत असतात. त्याशिवाय बदली कामगार पाठवण्याचे प्रकार बऱ्याचवेळा घडतात. अशा प्रवृत्तींनाही बायोमेट्रिक हजेरीमुळे आळा बसण्यास मदत होणार आहे. सध्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ सकाळी ६ ते दुपारी १ अशी आहे. या दोन्ही वेळेत बायोमेट्रिक हजेरीची नोंद केली जाणार आहे. साधारणपणे महापालिकेकडे ७४८ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची आता ऑफलाईन नव्हे, तर ऑनलाईन हजेरीची नोंद होणार आहे.
................

आठ दिवसांनंतर येणार सुसूत्रता
नवीनच बायोमेट्रिक मशिनरी बसवल्या आहेत. उद्यापासूनच (ता. १८) त्यावर थम्ब इम्पप्रेशन केल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांची ऑनलाईन हजेरी नोंद होणार आहे. सुरुवातीला काही दिवस ही प्रक्रिया पूर्ण करताना गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे; पण आठवडाभरानंतर यामध्ये सुसूत्रता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
....................

हजेरी प्रक्रिया वेळेत होणार
वर्षभरापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर आठ बायोमेट्रिक मशिनरी बसवल्या होत्या. मात्र, कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे व तांत्रिक त्रुटीमुळे हा प्रयोग यशस्वी झाला नाही. आता मात्र प्रत्येक वॉर्डात एक नवीन बायोमेट्रिक मशिन बसवण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित राहणार असल्यामुळे हजेरीची प्रक्रिया वेळेत होणार आहे.