
व्हेल उलटी
89816
‘व्हेल’च्या उलटीसह
२५ कोटींचा मुद्देमाल जप्त
मसुरेत सापळा; दोन मोटारींसह नऊ जण ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ : व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्रीसाठी नेणाऱ्या नऊ संशयितांकडून २४ किलो २६४ ग्रॅमच्या व्हेल मासा उलटीसदृश पदार्थाचे तुकडे, दोन चारचाकी, दुचाकी असा सुमारे २५ कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला. मसुरे मार्गावरील वेरळ माळरानावर आज दुपारी दोनच्या दरम्यान कारवाई केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हेल माशाची उलटी जप्त करण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच कारवाई आहे. या प्रकरणी नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि अप्पर पोलिस अधीक्षक नितीन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
दरम्यान, यापूर्वी तालुक्यातील तळाशील समुद्र किनाऱ्यावरून एकूण २७ लहान-मोठ्या आकाराचे सुमारे १८ किलो ६०० ग्रॅमचे उलटीसदृश पदार्थाचे तुकडे जप्त केले होते. ही कारवाई १० फेब्रुवारीला पोलिसांनी केली होती. आता पुन्हा तालुक्यातच मोठ्या प्रमाणात उलटीसदृश पदार्थाचे तुकडे जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले व त्यांच्या पथकाने कारवाई केली. तालुक्यातील मसदे ते मसुरे मार्गावर दोन चारचाकी आणि मोटारसायकल आल्या. त्याची तापसणी केली असता मोटारी (एमएच ४८ एडब्ल्यू ५४२३) मधून १२ किलो ५२८ ग्रॅम तर मोटारी (एम ०७ एजी ३६१०) मधून ११ किलो ७३६ ग्रॅमचा उलटी सदृश पदार्थ जप्त केला. मोटारसायकल (एमएच ०७ झेड ६४८८) जप्त केली. दुपारी सुरू केलेली कारवाई सायंकाळी सहापर्यंत चालली होती. सर्व नऊही संशयियीतांवर वन्य जीव संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आज सापडलेला हा पदार्थ ताब्यात घेतल्यानंतर याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
तरंगते सोने
स्पर्म व्हेल प्रजातीतील देवमाशाची उलटी अर्थात अंबरग्रीस अतिशय सुगंधी असते. तिला जगभरात मोठी मागणी आहे. ती, सोन्याच्या भावाने विकली जाते. त्यामुळे ‘समुद्रातील तरंगते सोने’ असेही तिला म्हटले जाते. देवगड तालुक्यातील तारामुंबरी, तर मालवणातील देवबाग समुद्र किनारी सापडलेली देवमाशाची उलटी स्थानिक मच्छीमारांनी वन विभागाच्या ताब्यात दिली होती. त्यानंतर जिल्ह्यात अंबरग्रीस तस्करीची प्रकरणेही उघडकीस आली होती.
तळाशील कनेक्शन
दरम्यान, सांगलीत उघडकीस आलेल्या अंबरग्रीस तस्करी प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्याचे ‘तळाशील कनेक्शन’ समोर आले होते. त्यानंतर आता तर सर्वात मोठी कारवाई करण्यात येऊन तब्बल २५ कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याने वन विभागही सखोल चौकशीच्या कामाला लागणार असल्याचे चित्र आहे.