
दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक
89914
------------
मोटारसायकली चोरणाऱ्या दोघांना अटक
---
आठ दुचाकी जप्त; मिरवणूक- शर्यतीच्या वापरासाठी होत होती विक्री
कोल्हापूर, ता. १८ ः मोटारसायकली चोरून त्यात बदल करून मिरवणूक आणि शर्यतीसाठी वापरणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. विशाल रवींद्र कांबळे (वय १९, रा. सरनोबतवाडी, ता. करवीर) आणि प्रतीक चंद्रकांत पवार (१९, रा. लालबहादूर शास्त्रीनगर, आंबेडकर चौक, शिरोली पुलाची) अशी त्यांची नावे आहेत.
दोन चोरट्यांकडून अधिक तपासात दोन लाख रुपये किमतीच्या आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दिली. इस्पुर्लीतून चोरीस गेलेल्या मोटारसायकलीच्या तपासातून ही माहिती पुढे आली. गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी मिळालेली मोटारसायकल जप्त करून चोरट्यांना इस्पुर्ली पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी सांगितले, की शहर परिसरासह जिल्ह्यात मोटारसायकली चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. याबाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांना तातडीने तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रेकॉर्डवरील चोरट्यांचा शोध घेण्यासह इतर तांत्रिक तपास करण्यात येत होता. त्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अंमलदार वसंत पिंगळे व हिंदुराव केसरे यांना काल (ता. १७) मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल चोरटे विशाल कांबळे व प्रतीक पवार हे चोरलेली मोटारसायकल विक्रीसाठी शिये येथील एका हॉटेलसमोर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तेथे सापळा रचून त्यांना मोटारसायकलीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी इस्पुर्ली येथून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ग्रामीण भागातून चार महिन्यांत एकूण आठ मोटारसायकली चोरल्याचे त्यांनी सांगितले. त्याची किंमत अंदाजे सुमारे दोन लाख रुपये होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.