
संगीतसूर्य केशवराव भोसले
संगीतसूर्य नामकरण,
पुतळ्याचा मुहूर्त कधी?
स्मृती शताब्दी वर्षानंतर अजूनही प्रस्तावावर कार्यवाही नाहीच
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात त्यांचा पुतळा उभारावा आणि नाट्यगृहाचे अधिकृतपणे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असे नामकरण व्हावे, ही मागणी अजूनही प्रलंबित आहे. केशवराव भोसले यांच्या स्मृती शताब्दी वर्षात तरी या प्रस्तावाला मान्यता मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यालाही दोन वर्षे उलटून गेली तरी अद्यापही हा प्रस्ताव मंजूर झालेला नाही.
संगीतसूर्य केशवराव भोसले म्हणजे यांनी अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात संगीत रंगभूमीवर केलेल्या कार्याचा आजही गौरव होतो. त्यांनी सुरू केलेली ‘ललितकलादर्श'' संस्था आजही दिमाखात उभी आहे. केशवरावांनी मिळालेल्या मानधनातून शहरातील अनेक कामांनाही निधी दिला. त्यामुळे नाट्यगृहाचे संगीतसूर्य केशवराव भोसले असे नामकरण व्हावे आणि परिसरात त्यांचा पुतळा उभारावा, ही मागणी गेली कैक वर्षे सुरू आहे. या मागणीची दखल राज्य शासनाने घेत राज्य संगीत नाट्य स्पर्धेला संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह संगीत नाट्य स्पर्धा असे नामकरण केले. पण, महापालिकेच्या पातळीवर मात्र केवळ या मागणीचा ताकतुंबाच चालला आहे. कोल्हापूर महापालिका आणि नाट्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वर्षी पुरस्काराची घोषणा झाली. त्यानंतर समितीत कुणाचे किती सदस्य यावरून वाद झाला आणि पुढे ही चर्चाच अनेक वर्ष थांबली आहे.
--------------
मापं टाकून गायबच
पहिल्या टप्प्यातील कामासाठी आलेल्या आणखी काही निधीतून पुतळा आणि इतर कामे करण्याच्या हालचाली गेल्या मार्चमध्ये सुरू झाल्या. त्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी नाट्यगृहातील विविध ठिकाणी मोजणीही केली. पण, त्यानंतर अजूनही स्वच्छतागृहाच्या कामाशिवाय इतर काहीच हालचाली नाहीत.
-----------------
कोट
संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात, यासाठी कुटुंबीयांबरोबरच कलाकार व कलाप्रेमींकडूनही प्रयत्न सुरू आहेत. पण, महापालिकेच्या पातळीवर विविध मागण्या बरीच वर्षे प्रलंबित असून त्याबाबत आता तरी सकारात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे.
- अशोक पाटील, केशवराव भोसले यांचे पणतू