
परिवर्तनवादी चळवळीत कोसंबींचे योगदान भरीव; जोगेंद्र कवाडे
90193
कोल्हापूर : सम्यक कृतज्ञता सत्कार समितीतर्फे आर. बी. कोसंबी यांचा सत्कार करताना पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते जोगेंद्र कवाडे व जयदीप कवाडे. यावेळी प्रा. गौतमीपुत्र कांबळे, डॉ. नामदेव गोंधळी आदी उपस्थित होते.
परिवर्तनवादी चळवळीत
कोसंबींचे योगदान भरीव
जोगेंद्र कवाडे; सम्यक समितीतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : परिवर्तनवादी चळवळीत आर. बी. कोसंबी यांचे योगदान भरीव आहे, असे प्रतिपादन पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते जोगेंद्र कवाडे यांनी आज येथे केले. अलीकडच्या काळातील चळवळी गरीब आणि कार्यकर्ता श्रीमंत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सम्यक कृतज्ञता सत्कार समितीतर्फे आंबेडकरी चळवळीत पन्नास वर्षे काम केल्याबद्दल आर. बी. कोसंबी यांचा आज येथे सत्कार झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला.
कवाडे म्हणाले, ‘‘कोसंबी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक होते. चळवळीत त्यांना साथ देणाऱ्या सहकार्याची भूमिकाही महत्त्वाची आहे. त्यामुळे ही कृतज्ञता त्या सहकाऱ्यांप्रतीसुद्धा आहे. चळवळीतील कार्यकर्त्यांनी सामाजिक भान ठेवून गावांतील वादविवाद मिटवण्याचे काम केले आहे. लढा कोणताही असो, त्यात सहभाग घेऊन वंचितांना न्याय मिळवून देण्याची भूमिका कोसंबी यांनी बजावली आहे. आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते तयार करण्याचे काम ते आजही करत आहेत.’’
डॉ. नंदकुमार गोंधळी म्हणाले, ‘‘कोसंबी यांनी खडतर परिस्थितीतून आयुष्याचा प्रवास केला आहे. त्यांची विचारवंतांशी नाळ जोडली गेली असून, कोणताही लढा असो, त्यात त्यांचा पुढाकार राहिला आहे. समाज बांधवांचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत ते थांबत नाहीत. त्यांचे हे वैशिष्टय कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी प्रेरित करते.’’ आंबेडकरी चळवळीत ‘डुप्लीकेट’ कार्यकर्त्यांची कीड निर्माण झाली आहे. त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भीमसैनिकांनी पुढे यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रा. गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, ‘‘धर्माचा अतिरेकी हस्तक्षेप होत असून, धम्मक्रांतीला शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आठ राज्यात धर्मांतर बंदी कायदा लागू झाला आहे. तो महाराष्ट्रात आणला गेला, तर देशात अराजकता निर्माण होईल.’’ पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी कोसंबी यांचे चळवळीतील काम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. या वेळी व्यंकाप्पा भोसले, सुरेश शिपूरकर, आनंद राणे, अविनाश भूपाळी, ॲड. रमेश कुलकर्णी, चंद्रकांत यादव उपस्थित होते. रतन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.