महापुरातही पाणीपुरवठा राहणार सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापुरातही पाणीपुरवठा राहणार सुरळीत
महापुरातही पाणीपुरवठा राहणार सुरळीत

महापुरातही पाणीपुरवठा राहणार सुरळीत

sakal_logo
By

महापुरातही पाणीपुरवठा राहणार सुरळीत
पूररेषेपेक्षा अधिक उंच जॅकवेल; जलजीवन मिशन अंतर्गत विशेष काळजी
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : गेल्या चार वर्षांत दोनदा महापूर आला. या काळात नदीकाठावरील योजनांची जॅकवेल पाण्यात गेली. परिणामी, गावांचा पाणी पुरवठा बंदच राहिला. पुन्हा ती परिस्थिती उद्‍भवू नये, यासाठी आता काळजी घेतली जात आहे. जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असणाऱ्या पाणी योजनांची जॅकवेल उभारणी पूररेषेपेक्षा अधिक उंच केली जाणार आहे. त्यामुळे महापुरातही गावांचा पाणी पुरवठा सुरळीत राहाणार आहे.
गडहिंग्लजला महापुराचा तसा फारसा फटका नव्हता. पण, २०१९ मध्ये अतिवृष्टीने हिरण्यकेशी नदीला महापूर आला. न भूतो असा हा महापूर होता. एकच वर्ष मागे सरले आणि पुन्हा महापुराचा प्रश्न उभा राहिला. या दोन्ही महापुरात हिरण्यकेशी काठाला मोठा फटका बसला. कोट्यवधींचे नुकसान झाले. या काळात सारे जनजीवन विस्कळीत झाले.
बहुतांश गावाच्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजना हिरण्यकेशी नदीवरून आहेत. महापुरात हिरण्यकेशीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने या पाणी योजनांची जॅकवेल, विद्युत पुरवठा यंत्रणा पाण्याखाली गेली. परिणामी, गावांचा पाणी पुरवठा खंडित झाला. पावसाची मुसळधार सुरू आहे पण, पिण्यासाठी पाणी नाही अशी अवस्था झाली होती. महापूर ओसरल्यानंतर सारी यंत्रणा सुरळीत करण्यासाठीही काही दिवस जावे लागले होते. ही बाब लक्षात घेऊन जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना राबवल्या जाणार आहेत. या पाणी योजनांची जॅकवेल उभी करताना महापुराचा विचार केला आहे. ज्या उंचीपर्यंत महापुराचे पाणी आले होते, त्यापेक्षा अधिक उंच जॅकवेल केले जाणार आहे. भविष्यात महापूर आलाच तरी ते पाण्याखाली जाऊ नये, यासाठी ही काळजी घेतली आहे. त्यामुळे महापुरातही संबंधित गावात पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे.
-------------------
- जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना.... ८७
- हिरण्यकेशी नदीवरून पाणी योजना........... ३०
- सौर ऊर्जा प्रकल्पाच्या पाणी योजना.......... ६३
---------------
* सौर ऊर्जेवर चालणार योजना...
ग्रामपंचायतींचे उत्पन्न तोकडे आहे. तर पाणी योजनांची वीज बिले भरमसाट येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायती वीज बिलाच्या बोजाखाली दबल्या जात आहेत. यावर सौर ऊर्जेचा पर्याय शोधला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प राबवले जाणार आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या विजेवर या पाणी योजना चालणार आहेत. शिवाय शिल्लक राहिलेली वीज महावितरणला दिली जाणार आहे. हे प्रकल्प राबवतानाही पूररेषेचा विचार केला जाणार आहे.