
मनपाचे अंदाजपत्रक
महापालिकेचे अंदाजपत्रक आज
कोल्हापूर ः उत्पन्न वाढवण्याचे मोठे आव्हान असलेल्या महापालिकेचे अंदाजपत्रक गुरूवारी (ता.२३) मांडले जाणार आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यंदा सलग तिसरे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. सभागृहाची मुदत संपल्यानंतर प्रशासकपदाची सूत्रे डॉ. बलकवडे यांच्याकडे आली आहेत. कोरोनानंतर उत्पन्नाला आलेल्या मर्यादांमुळे उपलब्ध महसुलात प्रशासकीय खर्च, विकास कामे केली जात आहेत. यंदाही काही विभाग वगळता घरफाळा, पाणीपट्टी या महत्वाच्या विभागांकडून दरवाढ प्रस्तावित केलेली नाही. त्यामुळे विविध योजनांमधून आलेल्या निधीतून काही कामे सुरू असून स्वनिधीतून विकासकामे करण्यास मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या सादर होणाऱ्या अंदाजपत्रकात प्रशासन आव्हानांवर मात करत नवीन कोणत्या योजना राबवणार हे महत्वाचे ठरणार आहे. रखडलेले प्रकल्प, उत्पन्न उभे करण्यासाठी नवीन मार्ग, लोकसहभाग याबाबत अंदाजपत्रकातून काय मांडले जाणार याची उत्सुकता आहे. केएमटी तसेच शिक्षण समितीचेही अंदाजपत्रक मांडले जाणार असून, केएमटीला उर्जितावस्था देण्यासाठी प्रशासन काय करणार याकडेही लक्ष लागले आहे.