
सकाळचा पाठुपुरावा
लोगो - आमचं शहर, आमचं बजेट
अंदाजपत्रकात नागरिकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब
कोल्हापूर, ता. २३ ः विविध क्षेत्रातील थेट शहरवासीयांपर्यंत पोहोचून ‘सकाळ’ने महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकाबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या होत्या. त्या अपेक्षांमधून तयार केलेली ‘आमचं शहर, आमचं बजेट’ ही पुस्तिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यातील अपेक्षा तसेच महत्वपूर्ण सुचनांचा अंतर्भाव महापालिकेने अंदाजपत्रकात केला. त्यासाठी मोठ्या निधीची तरतूदही केली आहे.
शहराच्या विकासासाठी नेमके काय हवे हे त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासू नागरिकांपर्यंत पोहचून ‘सकाळ’ने चर्चा घडवून आणली होती. त्यात विविध योजनांबाबत अपेक्षा व्यक्त करताना महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या होत्या. त्याची ‘आमचं शहर, आमचं बजेट’ या पुस्तिकेतून मांडणी केली होती. ती प्रशासक डॉ. बलकवडे यांच्याकडे सुपूर्द केली होती. अंदाजपत्रकात त्यातील अपेक्षांचा समावेश करू, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. आजच्या अंदाजपत्रकात अनेक योजनांचा समावेश केल्याचे दिसून आले.
स्मशानभूमीतील पारंपरिक साधनांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ‘सकाळ’ने सातत्याने विद्युत दाहिनीचा पाठपुरावा केला होता. त्याचा संदर्भ देत प्रशासक डॉ. बलकवडे यांनी पंचगंगा तसेच कसबा बावडा स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसवण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी दोन कोटी ९० लाख रूपयांची तरतूदही केली असल्याचे सांगितले. याशिवाय बचत म्हणजे उत्पन्नात वाढ होत असते, असे सांगत अनेक तज्ज्ञांनी वीज खर्चात बचत करण्यासाठी सौर उर्जा वापरण्याचा मुद्दा मांडला होता. पाणीपुरवठा विभागाच्या उपसा केंद्र, जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी सौर उर्जेची यंत्रणा वापरण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. त्यासाठी एक कोटी २० लाखांची तरतूद केली आहे. तसेच महापालिका कार्यालयांच्या इमारती, दवाखान्यांच्या इमारतीतही ही यंत्रणा बसवण्यासाठी ३० लाखांचा निधी प्रस्तावित केला आहे. याशिवाय रसिक तसेच कलाकारांकडून आणखी एक आर्ट गॅलरीची मागणी केली जात होती. त्यानुसार राजारामपुरीतील जगदाळे हॉलमध्ये आर्ट गॅलरी उभी करण्यासाठी २० लाखांची तरतूद केली आहे.
----------------
चौकट
स्वच्छतागृहांसाठी दोन कोटींची तरतूद
शहरात पर्यटकांची संख्या मोठी असून स्वच्छतागृहांअभावी तसेच रस्त्यांच्या दुरवस्थेतून शहराची प्रतिमा डागाळते. हे लक्षात घेवून सात ठिकाणी स्वच्छतागृह उभारणीसाठी प्रशासनाने दोन कोटींची तरतूद केली. तसेच पार्किंगच्या जागांचा वापर, पाणी गळती रोखण्यासाठी वॉटर ऑडीट, उद्यानांची सुधारणा,कचरा उठाव, रस्ते सफाईबाबतच्या मुद्द्यांचाही अंदाजपत्रकात समावेश झाला आहे.