
मुश्रीफ समर्थक
मुश्रीफ समर्थक ‘ईडी’ च्या दारात
फसवणुकीचा गुन्हा ः ‘ईडी’ला दिले कारखान्याबाबतचे स्पष्टीकरण
कोल्हापूर, ता. २३ ः राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याकडून झालेल्या फसवणुकीबाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठी आज मुश्रीफ समर्थक शेतकऱ्यांनी मुंबईतील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) दारात ठाण मांडले. `गोकुळ’चे संचालक युवराज पाटील व संजय चितारी यांच्या नेतृत्त्वाखाली सुमारे एक हजारहून शेतकरी यात सहभागी झाले होते.
संताजी घोरपडे कारखान्यासाठी ४० हजार शेतकऱ्यांकडून प्रत्येकी दहा हजार रूपये वसूल केले. पण, संबंधितांना कारखान्याच्या सुविधा न दिल्याने त्यांची फसवणूक झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या अनुषंगाने मुश्रीफ यांच्या विरोधात विवेक कुलकर्णी यांच्यासह १६ जणांनी मुरगुड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आज मुश्रीफ समर्थक कारखान्याच्या सुमारे एक हजाराहून अधिक सभासद शेतकऱ्यांनी मुंबईच्या ईडी येथील कार्यालयावर धडक देत कारखान्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.
मुश्रीफ यांची आज ईडीकडून चौकशी
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीने चौकशीसाठी नवीन समन्स बजावले आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात उद्या (ता. २४) त्यांची ईडीकडून चौकशी होणार आहे.
कोल्हापुरात दाखल झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. या प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांची २४ मार्चला पुन्हा चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी त्यांची ईडीकडून चौकशी केली आहे. या वेळी मुश्रीफ यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांकडे पत्र दिले. या पत्रात चौकशीदरम्यान काही मागण्या केल्या होत्या. त्यांच्या या मागण्या ईडीकडून मान्य करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
‘अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया कंपनीला चालवायला दिला गेला. या दोन कंपन्यांमध्ये २०२० मध्ये करार झाला होता. हसन मुश्रीफ यांचे जावई या कंपनीचे मालक होते. कंपनीच्या मालकांना अनुभव नसतानाही हा करार झाला,’ असा आरोप करण्यात आला आहे. तसेच कोलकाता येथील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून १५८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. या संदर्भाने मुश्रीफ यांच्या घरावर सलग दुसऱ्यांदा धाड टाकण्यात आली आहे.