
चेतना स्नेहसंमेलन
91220
कोल्हापूर : चेतना विकास मंदिर शाळेच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सादर केलेला कलाविष्कार. (नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)
हमें छुना है आसमॉँ...
‘चेतना’च्या अमृत कलश स्नेहसंमेलनात विशेष मुलांचा कलाविष्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : ‘हमें लिखना है, पढना है, आगे बढना है, हमें छुना है आसमॉँ’ या गीतावर नृत्य करत आज विशेष मुलांनी आत्मविश्वास उंचावला. घरातील आईची गडबड दाखवताना ‘जन्म बाईचा’ या गीतावर मुलींनी महिलेच्या जन्माचे वास्तव मांडले. ‘इटस् टाईम टु डिस्को...’ म्हणत उपस्थितांनाही थिरकायला लावले. चार्ली चॅप्लीनच्या छोट्या छोट्या कृतीतून पालकांना खळखळून हसवले. निमित्त होते, चेतना अपंगमती विद्यालय आयोजित अमृत कलश या स्नेहसंमेलनाचे.
विशेष मुलांच्या कलागुणांच्या सादरीकरणाने संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहही काही काळ थबकले. दरम्यान, ए. जी. ट्रान्समिशन्सच्या कार्यकारी संचालिका मुग्धा देशपांडे यांनी विशेष मुलांसोबत त्यांच्या पालकांचेही मनोबल वाढविले. हर हर महादेव, युगत मांडली या उत्साही गाण्यांवरही ही विशेष मुले उत्साहाने थिरकली. झुंबा डान्स करत लयीत नृत्य करण्याचे कसबही त्यांनी उपस्थितांसमोर सादर केले. ‘वेड’ सिनेमातील गीतावर नृत्य सादर करून शिक्षक, पालक आणि पदाधिकाऱ्यांनाही वेड लावले. नृत्य करताना विद्यार्थ्यांमध्ये असणारा जोश आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून सर्वांनीच त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली. विद्यार्थ्यांचे सादरीकरण झाल्यानंतर पालकवर्गाने त्यांचे कौतुक केले. विद्यालयाच्या साधना, जिद्द-जिव्हाळा, आशा-उमेद, कामायनी, दिशा-कामायनी, अविष्कार, नंदनवन, जीवनज्योत, नवजीवन, प्रेरणा, आधार, सन्मती व पालवी गटांनी आपल्यातील कलागुण सादर केले. कार्याध्यक्ष पवन खेबुडकर व डॉ. सुनील पाटील यांनी सुत्रसंचालन केले. या वेळी दया बगरे, माजी मुख्याध्यापिका उज्वला खेबुडकर, अजया पाटील व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.