
अंगणवाडींचे रखडलेले भाडे जमा
अंगणवाडींचे रखडलेले भाडे जमा
इमारत मालकांना दिलासा; दीड वर्षांपासून होती प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ : तालुक्यातील काही अंगणवाडींना स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे या अंगणवाडींना भाड्याच्या इमारतींचा आधार आहे. मात्र, शासनाकडून दीड वर्षांचे इमारत भाडे रखडले होते. त्यासाठी इमारत मालकांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर अंगणवाडींचे तेरा महिन्यांचे इमारत भाडे जमा झाले आहे. उर्वरित चार महिन्यांचे भाडे लवकरच जमा होणार आहे. त्यामुळे इमारत मालकांना दिलासा मिळाला आहे.
बालकांना शाळेचा लळा लागावा या उद्देशाने गावागावात अंगणवाड्या सुरु केल्या आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक गावात अंगणवाड्यांची संख्या निश्चित केली आहे. शासनाकडून अंगणवाडींसाठी इमारती उभारल्या जात आहेत. मात्र, अद्यापही गडहिंग्लज तालुक्यातील ६३ अंगणवाडींना अद्याप स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे या अंगणवाड्या खासगी इमारतीत भरतात. शासनाकडून इमारत मालकाला भाडे दिले जाते. सरसकट एक हजार रुपये भाडे आहे. यातील ६० टक्के केंद्र तर ४० टक्के राज्य शासन भार उचलते.
मात्र, सतरा महिन्यांपासून शासनाकडून इमारत भाडेच आलेले नव्हते. परिणामी, इमारत मालकांची मोठी अडचण झाली होती. त्यांच्याकडून भाड्यासाठी तगादा लावला जात होता. अखेर १३ महिन्यांचे इमारत भाडे शासनाकडे जमा झाले आहे. सहा लाख ८३ हजार ४३१ इतकी ही रक्कम आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २०२२ आणि जानेवारी, फेब्रुवारी २०२३ या चार महिन्यांचे इमारत भाडे लवकरच जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. दोन लाख २८ हजार रुपये इतकी ही रक्कम आहे.
----------------------
भाडेवाढीकडे दुर्लक्ष
अंगणवाडींच्या इमारतीसाठी सरसकट एक हजार रुपये भाडे मिळते. कित्येक वर्षांपासून त्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. वाढत्या महागाईचा विचार करता भाडेवाढ होणे अपेक्षित आहे. त्याबाबतची मागणीही केली जात आहे. मात्र, शासनाकडून इमारत भाडेवाढीकडे दुर्लक्ष केले आहे.