नूतन सदस्यांसाठी ५ कोटी राखीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नूतन सदस्यांसाठी ५ कोटी राखीव
नूतन सदस्यांसाठी ५ कोटी राखीव

नूतन सदस्यांसाठी ५ कोटी राखीव

sakal_logo
By

लोगो- जिल्‍हा परिषद
-----

नूतन सदस्यांसाठी ५ कोटी राखीव
स्‍वनिधी खर्चास प्रशासनाचा विरोध; लोकप्रिय योजनांना दिला फाटा

सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता. २७ : जिल्‍हा परिषदेच्या सदस्यांसाठी अ‍सणाऱ्या स्‍वनिधीची रक्‍कम खर्च करण्याचा आग्रह अनेक बड्या लोकप्रतिनिधींनी केला होता. मात्र, प्रशासनाने या सर्वांना न जुमानता हा निधी खर्च करण्यास नकार दिला. त्यामुळे पुढील वर्षी जर सभागृह अस्‍तित्‍वात आले, तर सदस्यांना किमान ५ ते ६ लाख रुपये स्‍वनिधी उपलब्‍ध होणार आहे. या स्‍वनिधीसाठी ५ कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. मात्र, मागील सभागृहातील सदस्यांनी सुचवलेल्या कामांसाठी तरतूद न केल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्‍त होत आहे.
जिल्‍हा परिषदेचे अंदाजपत्रक नुकतेच सादर करण्यात आले. यात सदस्यांसाठी लोकप्रिय असणाऱ्या योजनांना फारसे स्‍थान दिलेले नाही. भाऊसिंगजी रोडवरील इमारत, पंचगंगा नदी प्रदूषण निर्मूलन हा अशाच योजनांचा एक भाग आहे. गेली कित्येक वर्षे भाऊसिंगजी रोडवरील इमारत निर्लेखन करून त्या जागेवर नवीन इमारत बांधण्याचा ठराव केला जातो. त्यासाठी निधीची तरतूद केली जाते. वर्षभर या कामाकडे कोणीच लक्ष देत नाही. मार्च महिन्यात ही रक्‍कम खर्च होत नसल्याचे सांगत बांधकाम समिती सदस्य व पदाधिकाऱ्यांना या रक्‍कमेचे वितरण केले जाण्याची प्रथा होती. पहिल्यांदाच जिल्‍हा परिषदेत प्रशासक असल्याने त्यांनी या तरतुदीला फाटा दिला.
पंचगंगा नदी प्रदूषणाबाबतही अशीच परिस्‍थिती आहे. नदी प्रदूषण निर्मूलनाची घोषणा करायची, यासाठी २५ ते ५० लाख रुपयांची तरतूद करायची. मात्र या तरतुदीतून नेमके काय काम घ्यायचे, ते काम किती उपयुक्‍त आहे, तरतूद असेल तर ती खर्च झाली का याची कधी कोणी पाहणी केली नाही. त्यामुळेच मध्यंतरी बंधारे बांधण्यावर झालेला खर्च, प्‍लास्‍टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यावर झालेला खर्च वादात अडकला. या सर्व प्रकरणाची मंत्रालयीन स्‍तरावरून चौकशीही करण्यात आली. त्यामुळे अशा योजनांना अंदाजपत्रकात फाटा दिला आहे.
जिल्‍हा परिषदेचा कारभार प्रशासकांकडे असल्याने व सभागृह अस्‍तित्‍वात नसल्याने काही लोकप्रतिनिधींनी स्‍वनिधीची रक्‍कम खर्च करण्याची मागणी केली होती. वर्षभर या निधीवर अनेकांचा डोळा होता. मात्र, सभागृह अस्‍तित्‍वात आल्यानंतर सदस्यांना निधी मिळणार नाही. तसेच आता जर निधीचे वितरण केले तर सर्वच गटात या निधीतून विकासकामे होण्याची सूतराम शक्यता नव्‍हती. त्यामुळे कोणत्याही परिस्‍थितीत सदस्यांच्या स्‍वनिधीला धक्‍का न लावण्याची भूमिका प्रशासक व प्रशासनाने घेतली आहे.
....
कोट
पुढील सभागृह अस्‍तित्‍वात आल्यानंतर सदस्यांना विकासकामांसाठी निधी आवश्यक आहे. हा निधी ज्या- त्या मतदारसंघात खर्च होणे अपेक्षित आहे. त्यामुळेच हा निधी राखीव ठेवला आहे.
- व्‍ही. टी. पाटील, मुख्य वित्त व लेखाधिकारी