दहावी, बारावीच्या १ लाख ८० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावी, बारावीच्या १ लाख ८० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण
दहावी, बारावीच्या १ लाख ८० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण

दहावी, बारावीच्या १ लाख ८० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण

sakal_logo
By

दहावी, बारावीच्या १ लाख ८० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण
कोल्हापूर विभागात २ लाख ५१ हजार परीक्षार्थी; १७ एप्रिलपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या वर्षी बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या, तर दहावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार कोल्हापूर विभागीय मंडळाकडून कार्यवाही वेगाने सुरू आहे. या विभागाच्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात सोमवारपर्यंत सुमारे १ लाख ८० हजार उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम पूर्ण झाले आहे.
कोल्हापूर विभागातून या वर्षी बारावीच्या १ लाख २० हजार ७९० आणि दहावीच्या १ लाख ३० हजार ७४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी १ मार्च, तर दहावीच्या उत्तरपात्रिकांच्या तपासणीचे काम ७ मार्चपासून सुरू झाले. मात्र, त्यातच विविध प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला. मात्र, शासनाने त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्‍वासन दिल्याने आठवड्याभरात त्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू झाले. त्यात आतापर्यंत १ लाख ८० हजार उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. शिक्षण मंडळाने केलेल्या नियोजनानुसार निकाल जाहीर झाल्यास यंदा शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणार आहे.
.....
कोट
कोल्हापूर विभागातील दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २५ टक्के काम १७ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पुढे शिक्षण मंडळाकडून निकाल तयार करण्याचे काम सुरू होईल.
-डी. एस. पवार, प्रभारी सचिव, कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ
.....
सहा दिवसांत २०० उत्तरपत्रिकांची तपासणी
एक परीक्षक साधारणतः सहा दिवसांत ८० गुणांच्या २००, तर ४० गुणांच्या ३५० उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम करतात. सहा परीक्षकांवर एक नियामक असतात. ते या परीक्षकांकडून आलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी करतात. ते एका दिवसाला किमान १०० उत्तरपत्रिकांची तपासणी करतात.
.....