निकालातील गोंधळावर ‘अभाविप’ आक्रमक

निकालातील गोंधळावर ‘अभाविप’ आक्रमक

फोटो-94899
.............

निकालातील गोंधळावर ‘अभाविप’ आक्रमक

शिवाजी विद्यापीठात निर्दशने; परीक्षा संचालकांच्या राजीनाम्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १० ः शिवाजी विद्यापीठाने जाहीर केलेल्या काही पदवी अभ्यासक्रमांच्या निकालात गुणांच्या ठिकाणी स्टार, हॅशटॅग, प्रश्नचिन्ह दिसणे, पात्रता पूर्ण नसल्याचे दाखविणे आदी स्वरूपातील गोंधळ असल्याचा आरोप करत त्याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आक्रमक भूमिका घेतली आहे. याअंतर्गत ‘अभाविप’ने सोमवारी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारून निर्दशने केली.
या गोंधळाला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी ‘अभाविप’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांनी आंदोलन सुरू केले. मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा देत त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वात ठिय्या मारला. जोपर्यंत चर्चा करण्यासाठी विद्यापीठाचे अधिकारी आंदोलनस्थळी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी दुपारी एकच्या सुमारास प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव आले. त्यांनी मागण्यांच्या पूर्ततेबाबत सकारात्मक कार्यवाहीची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात ‘अभाविप’चे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे, सहमंत्री अमोघ कुलकर्णी, दिनेश हुमनाबादे, प्रसाद लष्कर, स्वप्निल पाटील, पंकज जत्ते, शिवतेज शेटे, श्रीनाथ साळुंखे आदी सहभागी झाले.
...........

निकालात चुका आढळल्यास सुधारणा

जाहीर केलेल्या निकालात गुणांच्या ठिकाणी स्टार, हॅशटॅग, प्रश्नचिन्ह आढळल्यास त्यामध्ये सुधारणा केली जाईल. पात्रतेअभावी ज्यांचे निकाल राखीव आहेत, अशा विद्यार्थ्यांनी पात्रतेची कार्यवाही लवकर पूर्ण करावी, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले. महाविद्यालयांकडून विद्यापीठाकडे वेळेत पात्रतेची कागदपत्रे सादर झाली नसल्याच्या तक्रारीबाबत चौकशी केली जाईल, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत, गुण पडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्याची मागणी ‘अभाविप’च्या पदाधिकाऱ्यांनी केली.
..........

तर, राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही

‘या निकालातील गोंधळाबाबत ‘अभाविप’ने विद्यापीठ प्रशासनाला ५ एप्रिल रोजी निवेदन दिले होते. त्यावर कार्यवाही झाली नसल्याने सोमवारी आम्ही विद्यापीठात आंदोलन केले. विद्यार्थ्यांना आलेल्या सर्व समस्यांचे लेखी तक्रार अर्ज परीक्षा नियंत्रकाकडे जमा केले आहेत. जर विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल पुढील सात दिवसांमध्ये लागले नाही, तर परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. जाधव यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा अनिल ठोंबरे यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com