
अमल राजाराम कारखाना
आमदार सतेज पाटील यांचा तोल सुटला
अमल महाडिक : महाडिक भ्याले असते तर त्यांच्या घरी गेले असते का?
कोल्हापूर, ता. १० : ‘महाडिक भ्याले (घाबरले) असते तर महादेवराव महाडिक आमदार सतेज पाटील यांच्या घरी गेले असते का?’ असा सवाल करत श्री. पाटील हे पालकमंत्री असताना आम्ही कधी त्यांना अधिकाऱ्यांवर दबाव टाकला असे म्हणालो नाही. त्यांचा लोकशाहीवर विश्वास असेल तर त्यांना उच्च न्यायालयात जायला आमची हरकत नाही. पण, २९ उमेदवार न्यायिक मार्गाने अवैध ठरल्यामुळे आमदार सतेज पाटील यांचा तोल गेला आहे. ते काय करतात आणि बोलतात हे श्री. पाटील यांना कळत नसल्याची टीका माजी आमदार अमल महाडिक यांनी आज केली. राजाराम कारखान्याचे २९ उमदेवार अवैध ठरले. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी महाडिक यांच्यावर महाडिक भ्याले, अशी टीका केली होती. याला अमल महाडिक यांनी प्रतिउत्तर दिले.
श्री. महाडिक म्हणाले, ‘महादेवराव महाडिक यांच्या गाडीचा दरवाजा उघडणाऱ्या आमदार सतेज पाटील यांना घाबरण्याचे काहीही कारण नाही. सतेज पाटील यांच्या राजकारणाची सुरुवात ही महादेवराव महाडिक यांच्यापासूनच झाली आहे. आम्ही लढणारी माणसे असून समोरुन लढत आहोत आणि जिंकणार आहोत. सरकारी यंत्रणेचा दबाव टाकून निकाल घेतला म्हणणाऱ्या सतेज पाटील यांनी स्वत: अधिकाऱ्यांना फोन करून पहावे. त्यांनी स्वत: पालकमंत्री म्हणून काम केले आहे. सरकारी यंत्रणेवर दबाव टाकून काम करता येते, हे पाटील यांच्या विचारातूनच आले आहे. आम्ही कधीही त्यांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला असे म्हणालो नाही. माझा न्यायालयावर विश्वास आहे. आम्ही त्याच पद्धतीने न्याय मागतो. याउलट सतेज पाटील हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजाराम कारखान्याची निवडणूक पार्टीच्या पातळीवर नेत आहेत. मात्र शेतकरी हा सर्वपक्षीय आहेत. तो कोणताही पक्ष बघून नव्हे तर चांगले काम बघून मतदान करणार आहे. राजाराम कारखान्यामध्ये जुनी यंत्रणा आहे. काहीही नसताना इतरांबरोबरीने उसाला दर दिला आहे. दरम्यान, डी. वाय. पाटील कारखान्याची चारवेळा निवडणूक बिनविरोध केली. त्यांच्याकडून कधीही अहवाल काढला जात नाही. सभासदांना किती साखर दिली जाते ते माहिती नाही. सभासद कोठे आहेत हे माहिती नाही. मात्र, त्यांना राजाराम कारखान्यात काय चालले आहे. याची माहिती पाहिजे. जर तुम्ही तुलनाच करत असाल तर ती डी. वाय. पाटील कारखान्यासोबतच होऊ दे.’
या वेळी, कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील, भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्र्वराज महाडिक, डॉ. मारुती किडगावकर, दिलीप उलपे, प्रशांत तेलवेकर, किरण जाधव, आनंदा तोडकर, सुरेश पाटील, जयसिंग पाटील, रावसाहेब चौगुले, मारुती वंडकर आदी उपस्थित होते.
...
* सभासदांना मानसन्मान देत आलो आहे
‘सभासदांनी २७ वर्षे कारखाना आमच्याकडे दिला आहे. आम्ही जरी घरदार फिरत असलो तरी विरोधकांचेही घरदार प्रचारात उतरले आहे. हे पाटील यांना दिसत नाहीत का? सभासदांनी सत्ता दिली तर त्यांना सन्मान देण्यासाठी जायला आम्हाला कोणताही संकोच वाटत नसल्याचे श्री. महाडिक यांनी सांगितले.
...
* रात्री कशासाठी आले, हे पाटील यांनाच विचारा
कारखाना बंद असताना सतेज पाटील गटाचे लोक कशासाठी कारखान्यात गेले हे त्यांनाच विचारले पाहिजे. राजारामच्या निवडणुकीत गोकुळ, जिल्हा बँक, डी. वाय. पाटील कारखान्याचे कर्मचारी, डी. वाय. पाटील उद्योग समूहाची यंत्रणा सक्रिय केली आहे. त्याचा वापर करून राजारामची निवडणूक लढवत आहेत. याउलट मी एकटा आणि माझे कार्यकर्ते ही निवडणूक लढवत आहे. त्या-त्या गावातील सभासदांपर्यंत पोचत असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
...
* ज्यांच्याकडे त्रुटी होती त्यांच्यावर आक्षेप
‘ज्या-ज्या लोकांच्या व्यवहारात त्रुटी आहेत. त्यांच्यावरच आम्ही आक्षेप घेतला आहे. ते सर्व लोक अवैध ठरले आहेत. त्यांनी आमच्या एकाच व्यक्तीवर आक्षेप घेतला. त्यांनी सर्व लोकांवर आक्षेप घेतला असता तर आमची कोणतीही हरकत नव्हती’, असा टोलाही श्री. महाडिक यांनी लगावला.
...
* कंडका पाडण्याची भाषा माझी नाही
‘कंडका पाडण्याची भाषा माझी नाही. सभासद त्यांचाच कंडका पाडतील. मला सहकार महत्त्वाचा आहे. सहकार टिकला पाहिजे. उत्पादक सभासदांना न्याय दिला पाहिजे. यासाठी आपण काम करतो.’, असेही श्री. महाडिक यांनी सांगितले.