शिवजयंती

शिवजयंती

फोटो -
....

प्रबोधनात्मक फलकांनी मिरवणुका लक्षवेधी

आतषबाजीने रंगत वाढलीः महिलांचा उत्स्फूर्त सहभाग


सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २२ : प्रबोधनात्मक फलक, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग व रोषणाईने उजळून गेलेले रस्ते, अशा वातावरणातील शिवजयंतीच्या मिरवणुकांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. शिवगीतांवर ठेका धरत तरूणाईने नृत्य केले, तर आतषबाजीने मिरवणुकीची रंगत वाढली. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या.
मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरूण मंडळाच्या मिरवणुकीचे मालोजीराजे छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयश्री जाधव, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हलगी, घुमक्याच्या ठेक्याने मिरवणुकीत उत्साह पेरला गेला. महिलांनी लेझीमची प्रात्यक्षिके सादर करत रंगत वाढवली. ‘कोल्हापूर शहरातील वाहतुकीची कोंडी सुटणार काय?’, ‘वाढती अतिक्रमणे, प्रशासनाचे दुर्लक्ष, बेजबाबदार नागरिक कधी शहाणे होणार?’,‘ शहराची बकाल दूरवस्था थांबवा बाबांनो,’ ‘कोल्हापूर शहराची ग्रामपंचायत करा ! नेत्यांनो कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी नैसर्गिक न्याय द्यायचा नसेल तर तुमच्या स्वार्थासाठी महापालिकेची ग्रामपंचायत करा,’ ‘पंचगंगा जगवायची की मारायची तुम्हीच ठरवा !’, ‘जिजाऊंसारखे बालमनावर संस्कार घडवा. मोबाईलच्या युगात लहान मुलांकडे दुर्लक्ष करू नका, मोबाईलचा अतिरेक व गैरवापर होऊ देऊ नका,’ ‘रंकाळा तलाव पहिल्यांदा शुद्धीकरण करा, मग सुशोभिकरण करा. आजपर्यंत रंकाळा सुशोभिकरण व शुद्धीकरणावर किती कोटी खर्च झाले, याचा काही हिशेब आहे काय? या खर्चात नवा तलाव बांधून झाला असता,’ ‘खंडपीठासाठी कोल्हापूरची चेष्टा थांबवा. कोल्हापूरला हायकोर्टाचे खंडपीठ मिळालेच पाहिजे,’ ‘कोल्हापूर शहराचा विकास करायचा नाही ना ! राहू देत. किमान चांगले रस्ते, पिण्यासाठी पाणी, स्वच्छतागृहे या भौतिक सुविधा तरी द्या,’ ‘राज्यकर्त्यांनो सरकारी पैशात उभारलेल्या वास्तूवर स्वत:ची व खानदानाची नावे कोरून त्याचा खासगी वापर करू नका,’ ‘आजच्या तरूणांनो आपले तारूण्य व्यसनांच्या आहारी घालवून संपवू नका,’ या रिक्षावर लावलेल्या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले. बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, बिंदू चौक, खासबाग मैदान ते पुन्हा मिरजकर तिकटी असा मिरवणुकीचा मार्ग राहिला.
वस्ताद बाबूराव चव्हाण, उत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल डाकवे, अनिकेत घोटणे, सौरभ डाकवे, साई चौगले, प्रसाद देवणे, श्रीधर पाटील, निखिल पाटील, संदीप चौगुले, बाळासाहेब पाटील, रमेश मोरे, बाबा पार्टे, अशोक पोवार, प्रथमेश मोहिते, चंद्रकांत भोसले, आर्यन जाधव मिरवणुकीत सहभागी झाले होते.
घिसाड गल्लीतर्फे महाराणा प्रताप चौक येथून मिरवणुकीस सुरवात झाली. महाराणा प्रताप यांची प्रतिमा, करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मोठ्या प्रतिकृतीसह वीरासनातील शिवछत्रपतींचा पुतळा मिरवणुकीत होता. आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, खासबाग मैदानमार्गे मिरजकर तिकटी येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका ते महाराणा प्रताप चौक असा मिरवणुकीचा मार्ग होता. त्यापाठोपाठ संयुक्त कनाननगर, शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील मराठा वॉरिअर्स, शाहूपुरी फुटबॉल स्पोर्टसची मिरवणूक होती. संयुक्त रविवार पेठेच्या मिरवणुकीत शिवछत्रपतींच्या पुतळ्यासोबत श्रीरामाचे कटआऊट होते.
संयुक्त उत्तरेश्‍वर पेठेच्या मिरवणुकीचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, मालोजीराजे छत्रपती, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या उपस्थितीत उद् घाटन झाले. धनगरी ढोलाच्या ठेक्यावर महादेव मंदिर येथून मिरवणूक मार्गस्थ झाली. गंगावेस, रंकाळा स्टँडमार्गे ताराबाई रोडवर मिरवणूक आल्यानंतर लेझर शोचा झगमगाट सुरू झाला. त्यानंतर मिरवणूक महाद्वार रोडच्या दिशेने पुढे गेली. अध्यक्ष अमित बाबर, दीपक घोडके, किशोर माने, गणेश सुतार, प्रकाश गवंडी, पिंटू काटकर, रमेश सुर्वे, शेखर केणे, अविनाश पाटील, सुरेश सुतार, सुरेश कदम, शिवतेज सावंत, जलराज कदम यांनी संयोजन केले.
----------------
चौकट

बिंदू चौकात या.. पण

बिंदू चौकात या..! पण राजकीय इर्षेसाठी नको. बिंदू चौक स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्याचे स्मारक आहे, याचे भान ठेवा आणि कोल्हापूरच्या विकासासाठी काय केलंय ते सांगायला बिंदू चौकात या..! असा मजकूर असलेला फलक मिरवणुकीत चर्चेचा ठरला. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर बिंदू चौकात घडलेल्या घटनेची त्याला किनार होती.
----------------
चौकट

लक्षवेधी चंडा नृत्य
सानेगुरूजी वसाहतीतील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या मिरवणुकीत चंडा नृत्य लक्षवेधी ठरले. आपटेनगरातून मिरवणुकीची सुरवात झाली. राज्याभिषेकाचा सजीव देखावा, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमावर आधारित चित्ररथ, शिवकाळातील महिलांना असलेले आदराचे स्थान याचा फलक मिरवणुकीत होता. मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com