पाणथळावरील पक्षांच्या जीवनावर परिणाम

पाणथळावरील पक्षांच्या जीवनावर परिणाम

फोटो 
99265, 99266, 99267
.............................

पाणथळावरील पक्षी वैभव धोक्यात

तापमानाने चाळीशी ओलांडली; तलावांतील पाणी आटल्याने जैवसाखळी होतेय नष्ट

सकाळ वृत्तसेवा  

कोल्हापूर, ता. २८ : शहरातील तापमानाच्या पातळीने चाळीशी ओलांडली आहे. परिणामतः कळंबा तलावातील पाणीही आटले आहे. त्यामुळे येथील जैवसाखळी नष्ट होत आहे, साहजिकच येथील पक्षी वैभवही धोक्यात आले आहे. कळंबा तलावाप्रमाणे शहर आणि परिसरातील इतर जलाशयांचीही पाणी पातळी घटत आहे. दलदल सुकल्यामुळे यातील जीवसृष्टी नष्ट होत आहे. याचा स्थलांतरित पक्षी आणि पाणथळावरील पक्ष्‍यांच्या जीवनावर परिणाम होत असून ही धोक्याची घंटा असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
कळंबा, रंकाळा आणि शहरातील इतर पाणथळांवर सुमारे २०० ते २५० जातीचे पक्षी आढळतात. यामध्ये परदेशी स्थलांतरित पक्षांप्रमाणे स्थानिक स्थलांतरित पक्षीही असतात. शिवाय जंगली पक्षीही आहेत. पाणथळावर जगणाऱ्या पक्षांसाठी परिजीव रचना असणे गरजेचे असते. काठावर राहणारे बदक, खंड्या, जांभळी कोंबडी, पाणबगळा, ससाणा, स्पॉट बील बदक, शेकोट्या अशा शेकडो पक्षांसाठी ही दलदल आवश्यक असते. या दलदलीत शंख, शिंपले, झिंगे आदी जीव हे या पक्षांचे खाद्य असते. तलावाच्या काठाला असलेल्या हॉटेल आणि मंगल कार्यालयांनी टाकलेला कचरा आणि त्यातून आलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांमुळेही प्रदूषणात वाढ होत आहे. तलाव परिसरातील वाढते नागरिकरण, प्रदूषण आणि आवाज याचा परदेशी पाहुण्यांच्या आगमनावर परिणाम झाला आहे. पक्षी निरीक्षण करण्यासाठी शाळा-कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. शिवाय हौशी आणि व्यावसायिक पक्षी निरीक्षकांचे कॅमेरे या पक्ष्‍यांचा पाठलाग करत असतात.
कळंबा, रंकाळा तलावांचे मोठ्या वेगाने सौंदर्यीकरण सुरू आहे. सौंदर्यीकरणाच्या नावावर झुडूप स्वरूपाची झाडे लावली जात आहेत. पण वड, उंबर, पिंपळ, पायरी, फायकस अशा जातीचे झाडे लावावीत. जेणेकरून सनबर्ड, बुलबुल, रॉबिन आदी पक्षी गोड मधासाठी या झाडांवर येतील. तलावाच्या काठाला पळस, पंगारा, काटेसावर ही चैत्र, वैशाखात फुलणारी झाडे लावली तर यावर पक्ष्‍यांच्या शाळा भरू शकतात. जंगली पक्ष्‍यांसाठी झाडांच्या ढोलीही घरट्याप्रमाणे वापरत येतात. गारवेलही थोड्या प्रमाणात हवी, त्यामुळे जांभळी पानकोंबडी शिकारी पक्षापासून बचावासाठी अशा ठिकाणी राहू शकते. अगदी वठलेली झाडेही काठावर असणे खंड्यासारख्या शिकारी पक्षांसाठी आवश्यक असते. मात्र उपद्रवत झुडपे काढून पक्ष्‍यांना विहार करण्यासाठी मोकळीक आवश्यक असते. 
काही वर्षांपूर्वी कळंबा तलावातील गाळ काढला होता, वृक्षतोडही झाली होती. त्यामुळे आणि पाणलोट क्षेत्रात झालेली बांधकामे कळंबा तलावाचे अस्तित्वच धोक्यात आणणारे आहे. त्यामुळे आता काही संस्था, संघटना जरी गाळ काढण्यासाठी प्रशासनाला निवेदन देत असले तरी याचा परिसंस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे हे नक्की.    
....

‘तलावकाठची दलदल ही परिसंस्था म्हणजे निसर्गाचे होकायंत्र असते. या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक किंवा हायमास्ट असू नयेत. बांधकाम केले जाऊ नये. नैसर्गिक अवस्थेतच येथील सौंदर्य ठेवावे. एकशे पन्नास वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या तलावाचा आता श्वास कोंडत आहे. त्यामुळे पक्षी वैभव धोक्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राजाराम तलाव, रंकाळा, कोटितीर्थ, वडणगे, लक्षतीर्थ आदी तलावांचेही नैसर्गिक रूप ठेवणे गरजेचे आहे.

सुहास वायंगणकर, पक्षी-निसर्ग अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com