अरुण गांधी- कोल्हापूरसाठी

अरुण गांधी- कोल्हापूरसाठी

९९९५२,
००१४७
वाशी ः गांधी फाउंडेशनच्या येथील जागेत ज्येष्ठ अरुण गांधी यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार झाले. तत्पूर्वी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह विविध संस्था, संघटना पदाधिकाऱ्यांनी अंत्यदर्शन घेतले.

अहिंसेचे पुरस्कर्ते
अरुण गांधी यांचे निधन
वाशी येथे अंत्यसंस्कार, महात्मा गांधी यांचे ज्येष्ठ नातू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू, अहिंसेचे पुरस्कर्ते व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक अरुण मणिलाल गांधी (वय ८९) यांचे आज पहाटे येथे निधन झाले. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘अवनि’ या संस्थेतच त्यांची प्राणज्योत मालवली. वाशी (ता. करवीर) येथील गांधी फाउंडेशनच्या जागेत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांचे ते वडील होत. त्यांच्यासह सोनल गांधी, कस्तुरी गांधी यावेळी उपस्थित होते.
श्री. गांधी यांचा जन्म १४ एप्रिल १९३४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद, भारतीय स्थलांतरितांविरोधातील भेदभाव आणि हिंसाचाराचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी त्यांच्यासोबत सेवाग्राम आश्रमात १९४६ मध्ये दोन वर्षे वास्तव्य केले. तेथेच त्यांना अहिंसेची तत्त्वे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची माहिती मिळाली आणि पुढे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी अहिंसेच्या मार्गानेच सक्रिय सहभाग घेतला. ते, स्वतःला शांती पेरणारा शेतकरी असे म्हणायचे.
त्यांनी भारतात आणि परदेशातही अहिंसेबरोबरच सामाजिक न्यायासाठी विपुल काम केले. त्यांनी १९८७ मध्ये एम. के. गांधी इन्स्टिट्यूट फॉर नॉनव्हायोलन्सची स्थापना केली. त्यांनी ‘द गिफ्ट ऑफ द ॲंगर : अँड अदर लेसन्स फॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी’, ‘लिगसी ऑफ लव्ह’, ‘बी द चेंज- अ ग्रॅंडफादर गांधी स्टोरी’, ‘डॉटर ऑफ मिडनाईट’ आदी विविध पुस्तकांचे लेखन केले. त्यांनी पत्रकार म्हणूनही काही काळ काम केले. ते, अमेरिकत स्थायिक असतानाही प्रत्येक वर्षी भारतात येत. त्यांना आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
श्री. गांधी ‘अवनि’चे अध्यक्ष अरुण चव्हाण यांचे मित्र. त्यांनी २००८ मध्ये गांधी वर्ल्डवाईड एज्युकेशन इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि त्या माध्यमातून ‘अवनि’ संस्थेच्या उपेक्षित आणि शोषित मुलांच्या पुनर्वसनाच्या कामाला बळ दिले. त्यांनी संस्थेला फेब्रुवारीमध्ये भेट दिली. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावली आणि ते येथेच थांबले. संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या हणबरवाडी येथील घरी ते वास्तव्यास होते. येथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा ८९ वा वाढदिवसही नुकताच संस्थेच्या वतीने साजरा झाला होता.
दरम्यान, वाशी येथील गांधी फाउंडेशनच्या जागेत सायंकाळी पाचपासून पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, डॉ. सुनीलकुमार लवटे, सचिन चव्हाण, अशोक रोकडे, उज्ज्वल नागेशकर, अमरजा निंबाळकर, बाजीराव खाडे, बी. ए. पाटील, गणी आजरेकर, तौफिक मुल्लाणी यांच्यासह विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरातून अंत्ययात्रा निघाली.

‘खादी ग्रामोद्योग’कडून आदरांजली
कोल्हापूर जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघ, जिल्हा स्वातंत्र्यसैनिक वारस संघटना, सर्वोदय शिक्षण मंडळ संचलित समता हायस्कूलतर्फे अरुण गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष सुंदर देसाई, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व्ही. डी. माने, डी. डी. चौगले, प्रा. सुजय देसाई, प्रा. सदाशिव मनगुळे, मुख्याध्यापक शशिकांत सावंत, सविता देसाई, गीता गुरव, सचिन पाटील, अमोल पाटील, संदीप शिंदे, अरुण मांगुरे, जैनुद्दीन पन्हाळकर, वनिता कांबळे आदींनी यावेळी मनोगते व्यक्त केली.

आदरांजली सभा शुक्रवारी
अरुण गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी विविध संस्था, संघटनांतर्फे शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी पाच वाजता आदरांजली सभा होणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनात ही सभा आहे.

कोल्हापूरचे ऋण कधीच
विसरू शकणार नाही ः तुषार गांधी
वडील अरुण गांधी आणि कोल्हापूरची नाळ अधिक घट्ट होती आणि म्हणूनच त्यांनी आयुष्याचा अखेरचा श्वास अगदी आनंदाने याच गावात घेतला. या गावाने नेहमीच आमच्यावर प्रेम केले असून, हे ऋण कधीही विसरू शकणार नाही, अशी भावना ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांनी व्यक्त केली.

गांधी विचार पुढे नेणे हीच आदरांजली ः श्रीमंत शाहू छत्रपती महाराज
महात्मा गांधी यांचा प्रत्यक्षात सहवास लाभला नाही; पण, अरुण गांधी यांनी त्यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेला. राजर्षी शाहूंच्या भूमीवर त्यांचे विशेष प्रेम होते आणि शाहूंच्याच भूमीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गांधी विचार नेटाने पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com