दुर्मिळ काटेसावर संरक्षणाविना

दुर्मिळ काटेसावर संरक्षणाविना

12755

मुख्यमंत्र्यांकडून ‘दखल’, वनविभागाकडून ‘बेदखल’!
अतिदुर्मिळ काटेसावर वृक्षाच्या संरक्षणाचा प्रश्‍न : कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्गावर अस्तित्त्व

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्गावर अतिदुर्मिळ काटेसावर वृक्ष आहे. त्याचे संरक्षण व्हावे, यासाठी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. मधूकर बाचूळकर यांनी पाठविलेल्या ई-मेलची दखल मुख्यमंत्री व वनमंत्री यांनी घेतली. तिसऱ्याच दिवशी ई-मेलला आलेल्या उत्तरात वृक्षाविषयी योग्य कार्यवाही करण्याबाबत वन विभागाला कळविल्याचे स्पष्ट करण्यात आले. कोल्हापुरातल्या वन विभाग कार्यालयाकडून मात्र संरक्षणाविषयी कोणत्याच हालचाली सुरू नसल्याचे दिसत आहे.
कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्गावरील गुरववाडी तर्फे शेणेवाडी गावाशेजारील एका वळणावर रस्त्याच्या कडेला काटेसावरीचा वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आहे. त्याच्या फांद्यांवर लालसर रंगाची फुले असून, फक्त एकाच फांदीवर पिवळ्या रंगाची फुले आहेत. महाराष्ट्रात लालसर रंगाची फुले देणारे काटेसावरचे वृक्ष सर्वत्र आढळतात. काही ठिकाणी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाची फुले देणारे दुर्मिळ काटेसावरीचे वृक्ष क्वचित आढळले आहेत. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर अत्यंत दुर्मिळ असा एकमेव दुरंगी काटेसावरीचा वृक्ष आहे. तसा वृक्ष कोठेही असण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्गाच्या रूंदीकरण सुरू आहे. रस्ते प्रकल्पात सर्व वृक्ष तोडले जात आहेत. त्यात हा काटेसावरीचा वृक्षही तोडला जाणार आहे. त्यास संरक्षण मिळणे व त्याचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे. या प्रकारचा वृक्ष कृत्रिम पद्धतीने, बियांपासून किंवा खोड कलमांपासून परत तयार करणे अशक्य आहे.
वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी महेश शेवाळे यांनी वृक्षाबाबत योग्य कार्यवाही करण्याचा आदेश वन विभागाला दिल्याचे कळवले. विशेष म्हणजे कोल्हापुरातील वन विभागाकडून वृक्षाच्या संरक्षणाविषयी बाचूळकर यांच्याशी कोणताच संपर्क झालेला नाही. तसेच शेवाळे यांच्याकडून मेल आल्याचे सांगण्यात आलेले नाही. याबाबत उप वनसंरक्षक गुरू प्रसाद यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कॉल रिसीव्ह झाला नाही.
-
कोट -
पश्‍चिम घाट जैवविविधतेने समृद्ध आहे. त्या भागात जाणाऱ्या मार्गावर काटेसावरचे संरक्षण करणे गरजेचे आहे. रस्ते विकासात त्याची तोडू होऊ नये, यासाठी ई-मेल केला होता. मुख्यमंत्री व वनमंत्र्यांनी त्याची दखल घेतली. इथल्या वन विभागाकडून संरक्षणाविषयी तातडीने कार्यवाही होणे आवश्‍यक आहे.
-डॉ. मधूकर बाचूळकर, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com