
ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया
ich286.jpg
05584
इचलकरंजी ः स्टेशन रोडवर जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.
---------------------
ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया
इचलकरंजीत जलवाहिनीला मोठी गळती; गळती काढण्यास प्रारंभ
इचलकरंजी, ता. २८ ः येथील स्टेशन रोडवर महवितरणसमोर गुरू चित्रमंदिरजवळ जलकुंभाला जाणारी शुद्ध पाण्याच्या जलवाहिनीला आज दुपारी मोठी गळती लागली. सुमारे तासभर या गळतीतून लाखो लिटर शुद्ध पाणी वाया गेले.
मनपा पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने पाणीपुरवठा बंद केला. त्यानंतर गळती काढण्याचे काम सुरू केले. यामुळे गुरू चित्रमंदिर परिसरातील जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. संबंधित परिसरात आता एक दिवस उशिरा पाणी येणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या परिसरातील नागरिकांनी पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
शहरातील शिवतीर्थ परिसरात असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी गुरु चित्रमंदिरजवळील जलकुंभासाठी भूमिगत जलवाहिनीद्वारे पाठवण्यात येते. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास या जलवाहिनीला महावितरणजवळ मोठी गळती लागली. गळतीमुळे रस्त्यावरच पाण्याचा मोठा उमाळा लागला. यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून लोंढा लागला. ही माहिती मिळताच मनपा पाणी पुरवठा विभागाने पाहणी केली. या मार्गावर जलशुद्धीकरण केंद्रातून जवाहरनगर व गुरु चित्रमंदिर अशा दोन जलकुंभासाठी पाणी पाठवले जाते. त्यामध्ये गुरु चित्रमंदिर जलकुंभासाठीच्या जलवाहिनीला गळती लागल्याचे आढळून आले. त्यानंतर तातडीने पाणीपुरवठा बंद केला.
या जलकुंभातून भोने माळ, विकासनगर, विक्रमनगर, सर्वोदयनगर, राजराजेश्वरीनगर, कापड मार्केट परिसरात पाणीपुरवठा केला जातो. यातील काही भागात आज सकाळी पाणीपुरवठा केला. उर्वरित भागाचा पाणी पुरवठा या गळतीमुळे विस्कळीत होणार आहे. गळती काढण्याचे काम उद्या (ता.२९) दुपारपर्यंत चालणार आहे. त्यानंतर उर्वरीत भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना एक दिवस पाणी येणार आहे. ऐन उन्हाळ्यात या नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या गळतीमुळे मात्र लाखो लिटर शुद्ध पाणी वाया गेले.
----
गळती काढण्याचे काम हाती घेतले आहे. उद्यापर्यंत हे काम चालणार आहे. हे काम संपल्यानंतर उर्वरित भागात तातडीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.
-सुभाष देशपांडे,
कार्यकारी अभियंता, इचलकरंजी महापालिका