रिंगरोडवरील अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिंगरोडवरील अतिक्रमण
रिंगरोडवरील अतिक्रमण

रिंगरोडवरील अतिक्रमण

sakal_logo
By

05618
...

तिसऱ्या दिवशी पुन्हा टपऱ्यांचे अतिक्रमण
---
रिंग रोडवरील साई मंदिर चौकातील प्रकार; अतिक्रमण निर्मूलन विभागाची कारवाई ठरतेय फार्स
कोल्हापूर, ता. २८ : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाची कारवाई म्हणजे चेष्टेचा विषय ठरत आहे. शहरातील अनेक ठिकाणी अगदी धडक कारवाईचे नाटक केले जाते आणि त्याच ठिकाणी पुन्हा दोन दिवसांत हातगाड्यांची गर्दी पाहायला मिळते. याचा अनुभव रंकाळा चौपाटीपाठोपाठ आता रिंग रोडवरील साई मंदिर चौकातही दुसऱ्यांदा येत आहे. रस्त्यातच चौकात असलेल्या हातगाड्या काढल्यावर तिसऱ्या दिवशी पुन्हा वाहतुकीला अडथळा करीत त्या दिमाखात उभ्या राहिल्या. त्यामुळे कारवाईचे नाटक कशासाठी, असा प्रश्न नागरिकांतून होत आहे. 
कोल्हापूर- गारगोटी महामार्गावरील रिंग रोडवर साई मंदिर चौकातील रिकाम्या जागेवर मोठी खाऊ गल्लीच तयार झाली. उपनगरांमुळे हा रस्ता रहदारीचा असतो. परंतु, येथील हातगाड्यांचे रस्त्यावर असलेले अतिक्रमण नागरिकांकडून तक्रारी होऊनही दुर्लक्षित आहे. मध्यवर्ती कारागृहापासून ते कळंबा गावाच्या हद्दीतील फुटपाथवर किंवा खाऊ गल्लीपासून आपटेनगरकडे जाणाऱ्या रिंगरोडवरील हातगाड्यांना शिस्त नसते. या रस्त्यावर मुख्य चौकात अगदी आयलँड सजविल्याप्रमाणे आठ ते दहा हातगाड्या लागलेल्या असतात. यावर आलेल्या ग्राहकांच्या दुचाकीही रस्त्यावर असतात. त्यामुळे सिग्नलला थांबणारे किंवा चौकातून जाणाऱ्या वाहनधारकांना कसरत करीत जावे लागते. याबाबत अनेकदा महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे तक्रार करूनही यावर कारवाई झालीच तर ती जुजबी असते. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात धडक कारवाईचा धाक दाखवत चौकातील सर्व गाड्या काढण्यात आल्या. परंतु, तिसऱ्याच दिवशी या ठिकाणी पूर्ववत सर्व हातगाड्यांवरील व्यवहार सुरू झाले. एकंदरीत हा कारवाईचा फार्स पुन्हा कशासाठी केला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
...
 
रस्ता कसा ओलांडायचा?
खरेतर येथील सिग्नलच चर्चेचा विषय ठरला आहे. दोन चौक असलेल्या रस्त्यावर असलेल्या सिग्नलमुळे अलीकडच्या चौकातील दोन्ही बाजूंच्या रस्त्याने येणाऱ्या वाहनधारकांनी रस्ता कधी क्रॉस करायचा, हाच वादाचा मुद्दा ठरत असतो. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिग्नल सुरू असला, की वाहतूक कोंडी ठरलेली असते. तिकटीचा रस्ता असल्याने डावीकडील सिग्नल खुले ठेवावेत, अशी मागणी होत असतानाही जेलकडून कळंब्याकडे जाणारा रस्ता किंवा आपटेनगर रिंगरोडवरून डावीकडे जाणारा रस्ता सिग्नलवर खुला नसल्याने वाहने थांबवावी की जावे, या संभ्रमात चालक असतात.
...

साई मंदिर चौकात सिग्नल केला आहे; परंतु डावीकडे जायला सिग्नल खुला का नाही, हा प्रश्न आहे. चौकातील रस्त्यावर मध्यभागी हातगाड्या कोणत्या नियमात अधिकृत होतात, याचाही खुलासा महापालिकेने करावा.
- संतोष जाधव, वाहनधारक