
‘आप’ची उद्या निर्धार सभा
आम आदमी पक्षाची उद्या निर्धार सभा
स्वराज्य यात्रा येणार; मनपा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुल वाजणार
कोल्हापूर, ता. २९ ः राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम आदमी पार्टीने (आप) रविवार (ता. २८) पासून पंढरपूर ते रायगड स्वराज्य यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा बुधवारी (ता. ३१) सायंकाळी पाच वाजता कोल्हापुरात येणार आहे. त्यादिवशी मिरजकर तिकटी येथे सायंकाळी सहा वाजता निर्धार सभा होणार आहे. त्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटालिया प्रमुख उपस्थित असणार आहेत. या सभेच्या माध्यमातून कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजविण्यात येणार असल्याचे ‘आप’चे महापालिका प्रचार समितीचे कार्याध्यक्ष संदीप देसाई यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
दसरा चौकात स्वराज्य यात्रेचे आगमन होईल. तेथून दुचाकी, रिक्षा रॅलीने यात्रा बिंदू चौक, आझाद चौक, टेंबेरोड मार्गे मिरजकर तिकटी येथे येणार आहे. महापालिका निवडणुकीची ‘आप’ने तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्धार सभा होणार आहे. त्यात पक्षाचे सहप्रभारी इटालिया मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापुरातून गुरुवारी स्वराज्य यात्रा इस्लामपूर, कऱ्हाड मार्गे सातारा जिल्ह्याकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी ‘आप’चे जिल्हाध्यक्ष नीलेश रेडेकर, जिल्हा युवाध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, संजय साळोखे, विजय हेगडे उपस्थित होते.