
जिल्हा बँक
जिल्हा बँकेची ८.०५ टक्के
व्याजदराची ध्येयपूर्ती योजना
कोल्हापूर, ता. २९ ः कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेवीवरील व्याजदरात भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ८.०५ टक्के व्याज दराची ‘ध्येयपूर्ती योजना’ सुरू करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या व्याजदराच्या वाढीनंतर ठेवीवरील कमाल व्याजदर साधारणतः आठ टक्के होतो. बँकेने चालू आर्थिक वर्षात नऊ हजार ५०० कोटी रुपयांच्या ठेवींच्या पूर्तीचा संकल्प केलेला आहे. यासाठी बँकेने २५ बी.पी.एस.ने व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे.
व्यक्ती व संस्था ठेवीदारांच्या आग्रहास्तव बँकेने एक जून २०२३ पासून ८.०५ टक्के इतक्या ज्यादा व्याजदराची ही योजना पुनश्च सुरू केली आहे. ही योजना मर्यादित कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली आहे. श्री. मुश्रीफ म्हणाले,‘जिल्हा बँक ठेवीदारांना जादा व्याजदर देण्यामध्ये नेहमीच अग्रभागी असते. ठेवीदारांनी बँकेच्या विविध योजनांसह ध्येयपूर्ती योजनेचा मागील वर्षीही ठेवीदारांनी लाभ घेतलेला आहे.’
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजू आवळे, आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड आदी संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.