सांस्कृतिक पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांस्कृतिक पट्टा
सांस्कृतिक पट्टा

सांस्कृतिक पट्टा

sakal_logo
By

05915
स्पर्श एकांकिका सादर
कोल्हापूर, ता. ३० ः स्पर्श जाणीव चॅरिटेबल फाउंडेशन संचलित आनंदयात्रीचे चौथे सत्र पार पडले. विजया मेहता यांच्या ‘झिम्मा’ या पुस्तकातील निवडक उतारे घेऊन ‘रंगायनचे दिवस’ हे अभिवाचन डॉ. रंजन कुलकर्णी आणि विशाखा जोशी यांनी सादर केले. त्यानंतर सुभाष सोनावणे लिखित आणि डॉ. मीना पोतदार दिग्दर्शित स्पर्श ही एकांकिका सादर झाली. महिलांचे मानसिक विश्व उलगडून सांगणाऱ्या या एकांकिकेत दृप्ता कुलकर्णी आणि डॉ. मीना पोतदार यांचा सहभाग होता. अक्षय सुतार आणि अजिंक्य यादव यांनी पार्श्वसंगीताची धुरा सांभाळली. विपुल देशमुख यांनी रंगमंच व्यवस्थापन केले.
---------------
उस्ताद हाजी बाबासाहेब मिरजकर स्मृती
समारोहात होणार ताल, सुरांची बरसात
कोल्हापूर, ता. ३० : येथील तबला विभूषण उस्ताद हाजी बाबासाहेब मिरजकर यांचे गंडाबंध शिष्य तबलावादक अतुल ताडे संचलित गुरुकुलतर्फे तबला विभूषण उस्ताद हाजी बाबासाहेब मिरकर स्मृती समारोहाचे आयोजन केले आहे. यात रसिकांना ताला-सुरांची बरसात अनुभवायला मिळणार असून, शनिवारी (ता. ३) सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा समारंभ होईल.
प्रसिद्ध गायक पं. चंद्रकांत लिमये यांच्या गायनाबरोबरच रफिक नदाफ व शफात नदाफ यांच्या सतारवादनाचा रसिकांना आनंद मिळणार आहे. गुरुकुलमधील प्रशांत शेवाळे, सूरजदीप सुतार, रविराज पोतदार, चिदानंद ताडे, प्रेम भिलुगडे, विवेक संकपाळ, प्रसाद सोनटक्के या शिष्यांचे तबलावादन होईल. संपूर्ण कार्यक्रमाला तबल्यावर अतुल ताडे, संवादिनीवर आनंद गुलगुंजे, गजानन सुतार यांची साथ लाभणार आहे. रसिकांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
-----------
05918
प्रिया देशपांडे यांच्या कवितांचे काव्यवाचन
कोल्हापूर, ता. ३० ः ‘युद्ध म्हणजे फसलेले राजकारण असते; तर राजकारण म्हणजे यशस्वी युद्ध होय’ अशा साध्या; पण दाहक आणि आत्मचिंतन करायला लावणारे, कवितांचे वाचन झाले. सोशल मीडियावर कविता लिहिणाऱ्या प्रिया प्रकाश देशपांडे आणि त्यांच्याशी संवाद साधत प्रसाद जमदग्नी, चारुदत्त जोशी आणि उमेश नेरकर यांनी या कवितांचे सादरीकरण केले. लक्ष्मीपुरी ग्रेन मर्चंट्‌स हॉलमध्ये कार्यक्रम झाला.
‘तुम्ही ज्याला वसंत म्हणता, ते जमिनीवरच प्रेम मिरवत असतात झाडं’ ही प्रिया देशपांडे यांच्या ‘झाड’ या कवितेतील ओळ. प्रिया पेशाने वकील असल्या, तरी त्या कथक नृत्यशिक्षिका आणि चित्रकार आहेत. वकिली, नृत्य, चित्रकला हे सर्व त्या विशिष्ट उद्देश ठेवून शिकल्या. मात्र, काव्यलेखन हे त्यांनी ‘इन सर्च ऑफ नथिंग’ केल्याचे सांगितले. शरद भुताडिया, प्रकाश आणि सुनंदा देशपांडे, दिलीप इंगवले, प्रभाकर वर्तक, वैभव सावर्डेकर, अभय अथणे, कृष्णात दिवटे, निलांबरी कुलकर्णी, गौरी भोगले, किशोर महाजन, अरुण डोंगरे, स्वाती उपाध्ये, सविता कबनूरकर, संजय शेलार, दिनेश माळी, डॉ. आशुतोष देशपांडे, डॉ. आशुतोष पोतदार, संजय रणदिवे, डॉ. रंजन कुलकर्णी, डॉ. भाग्यश्री मुळे उपस्थित होते. शीतल कुमठेकर व राजेंद्र लकडे यांनी परिश्रम घेतले.