
बाजार समिती
बाजार समितीत भाजीपाला
आवकेत अभूतपूर्व घट
---
उलाढालही थंडावली; कडक उन्हाचा परिणाम
कोल्हापूर, ता. ३० ः दिवसागणिक वाढलेला उन्हाचा तडाखा, दुष्काळी भागातील पाण्याची तीव्र टंचाई या अशा विविध कारणांमुळे भाजीपाल्याच्या काढणीला मर्यादा आल्या आहेत. परिणामी, येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेत शेतीमालाची आवक कमालीची घटली. घाऊक बाजार स्थापन झाल्यापासून गेल्या ३० वर्षांत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात आवक घटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रोज सरासरी २५० गाड्या भाजीपाल्याची आवक होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत अवघ्या ४० ते ४५ गाड्यांतून भाजीपाला येत आहे. यात गवार, ढब्बू मिरची, ओला वाटाणा, दुधी भोपळा, रताळी, पडवळ, भुईमूग शेंगा, काकडी या भाजीच्या ४० ते ५० पिशव्यांची आवक झाली. हा माल येथील स्थानिक गरज भागविण्यासाठी कमी पडतो. टॉमेटो, मिरची व फ्लॉवरची ३०० च्यावर पोती आली आहेत. मात्र, ही आवकही एरवीच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली; तर पालेभाज्यांमध्ये मेथी, पोकळा, आंबाडा अशा भाजीची आवक झालेली नाही. आलेल्या मालाचे सौदे अवघ्या एका तासात पूर्ण झाले, भाजीपाला संपून गेला. भाजीपाल्याच्या तुटवड्यामुळे बाजारपेठेतील एकूण उलाढालही थंडावली.
कवठेमहांकाळ, गोकाक, जमखंडी, चिक्कोडी भागातून येणाऱ्या भाजीपाल्याचा मोठा वाटा असतो. मात्र, गेल्या आठवडाभरापासून या भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे.
....
कोकणात पाठविण्यासाठी मालच नाही
कोल्हापुरातील मार्केट यार्डात येणाऱ्या आवकेतील ४० टक्के भाजीपाला कोकणकडे पाठविला जातो. मात्र, कोल्हापुरातील आवकेत घट झाल्याने कोकणाला पाठविण्यासाठी मालच शिल्लक राहिला नसल्याने जेमतेम एक-दोन गाडीच भाजीपाला देवगड, मालवणकडे रवाना झाला. उन्हाचा ताव असाच राहिला तर आणखी दहा-बारा दिवस अशीच स्थिती राहू शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.