
अकरावी प्रवेशासाठी आजपासून नोंदणी करा
अकरावी प्रवेशासाठी आजपासून नोंदणी करा
वाणिज्य इंग्रजी, विज्ञानची प्रक्रिया ऑनलाईन; शहरात ७४८० जागा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः शहरातील इयत्ता अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया उद्या, शुक्रवारपासून सुरू होणार आहे. याअंतर्गत वाणिज्य इंग्रजी माध्यम आणि विज्ञान विद्याशाखेतील प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. त्यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या (www.dydekop.org) या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जातील पहिला भाग (नोंदणी) भरायचा आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने यंदा कोल्हापूर शहरातील २८ कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य इंग्रजी माध्यम आणि विज्ञान विद्याशाखेचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने भाग एक आणि भाग दोन भरून घेऊन साधारणतः चार ते पाच फेऱ्यांमध्ये करण्याचे निश्चित केले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भाग एकमध्ये विद्यार्थी नोंदणी करावयाचे आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण माहितीचा (उत्तीर्ण वर्ष, बोर्ड, आसन क्रमांक, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख, प्रवेश अर्ज शुल्क) समावेश आहे. विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीचे मूळ गुणपत्रक प्राप्त झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक याच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थी आणि पालकांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर महाविद्यालयाची संयुक्त माहिती पुस्तिका, गतवर्षीचा कटऑफ, प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका, अर्ज कसा भरायचा याबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष महेश चोथे यांनी पत्रकाद्वारे दिली.
-
गोल ग्राफ करणे
विद्याशाखानिहाय उपलब्ध जागा
- वाणिज्य इंग्रजी माध्यम-१६००
-विज्ञान-५८८०