
इचल ः सूत व्यापारी फसवणूक फाॅलो-अप
मुख्य संशयित पंकज अग्रवाल ‘सीपीआर’मध्ये दाखल
इचलकरंजी सूत व्यापारी फसवणूक प्रकरण; उर्वरीत चौघाजणांचा शोध सुरू
इचलकरंजी, ता.1 ःसूत खरेदी करुन बनावट युटीआरद्वारे 1 कोटी 87 लाखाची फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित पंकज पुष्पक अग्रवाल याला गुरुवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. या फसवणूक प्रकरणात आणखी काही तक्रारी दाखल होण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर काहीजणांनी शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांची भेट घेवून चर्चा केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील उर्वरीत चौघाजणांचा शोध सुरु असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.
सूत व्यापारी पंकज अग्रवाल यांची पियुश टेक्स्टाईल नामक कंपनी आहे. त्याने या कंपनीच्या माध्यमातून गोपीकिशन हरीकिशन डागा यांच्या श्री हनुमान यार्न सिंडीकेट, श्री हरी सिंटेक्स या फर्ममधून सूत खरेदी केली होती. सूत खरेदीपोटी एनईएफटी केल्याचे सांगत डागा यांना युटीआर नंबर पाठवला. मात्र डागा यांनी बँकेत खात्री केली असता तो युटीआर नंबर बोगस असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अग्रवाल याने बोगस इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करुन 1 कोटी 87 लाख 2 हजारांची फसवणूक केल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिसांत दिली होती. त्यानंतर पोलिसांनी पंकज अग्रवाल, पियुश अग्रवाल यांच्यासह 6 जणांवर गुन्हा नोंद केला आहे. यापैकी पंकज आणि प्रविण अग्रवाल या दोघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र गुरुवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पंकज याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे तपासात फारशी प्रगती झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.