
कदंब महोत्सव रविवारी
कदंब महोत्सवाचा
यंदा दशकपूर्ती सोहळा
ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांचा होणार गौरव
कोल्हापूर, ता. २ ः येथील पाच ज्येष्ठ महिला साहित्यिकांनी एकत्र येवून सुरू केलेल्या कदंब महोत्सवाचा यंदा दशकपूर्ती सोहळा साजरा होणार आहे. राजेंद्रनगर परिसरातील मंजुश्री बंगला येथे रविवारी (ता.४) सायंकाळी सहाला हा सोहळा होणार असून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकुमार नलगे यांचा मानपत्र देवून गौरव होणार आहे.
अमेरिकेतील ट्यूलिप महोत्सव पाहिल्यानंतर पाच जून २०१३ रोजी पर्यावरणदिनाचे औचित्य साधून या महोत्सवाला प्रारंभ झाला. महोत्सवात त्या त्या वर्षात प्रसिध्द झालेल्या उत्कृष्ट कवितासंग्रहाना कदंब पुरस्कार दिला जातो. एका वृक्षाच्या नावे दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील हा एकमेव पुरस्कार आहे. कोरोनानंतर यंदा हा सोहळा होत असून कदंबाच्या साक्षीने आजवर अनेक ज्येष्ठ आणि प्रसिध्द कवींसोबतच अनेक नवोदित कवींना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. कदंब पुरस्कार केवळ झाडांवर प्रेम करा असे सांगत नाही तर त्यांचा आदर करा, सन्मान करा असा संदेश देतो. डॉ. कमलताई हर्डीकर, निलाम्बरी कुलकर्णी, गौरी भोगले, मंजुश्री गोखले आणि डॉ. प्रमिला जरग यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
............
वाचन साखळी प्रकल्पाला प्रारंभ
कोल्हापूर, ता. २ ः शालेय शैक्षणिक वर्षाच्या आरंभमासाचे औचित्य साधून कालपासून राज्यभरात वाचन साखळी प्रकल्पाला प्रारंभ झाला. बालक पालक फाउंडेशनच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्यातील विविध तालुक्यातील प्राधान्याने ग्रामीण अथवा निमशहरी भागात शिकणाऱ्या शालेय वयांतील मुलांना पुस्तके पोस्टाने पाठवण्यात आली आहेत.
उपक्रमांतर्गत इच्छुक विद्यार्थी पालकांच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी करतात. त्यानंतर त्यांच्या हस्ताक्षरात त्यांचा पत्ता मागविला जातो. फाउंडेशन त्यांना संपर्क साधते. त्याची किंवा तिची वाचनाची भूक लक्षात घेवून विद्यार्थ्याची लाभार्थीं म्हणून निवड केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यास पुस्तकाच्या दोन प्रती त्याचे नाव असलेला पत्ता लिहून पाकिट पोस्टाने पाठविण्यात येते. त्यातील एक प्रत दुसऱ्या एका समवयस्क मित्रास किंवा मैत्रिणीस भेट देवून लाभार्थी आपली वाचन साखळी बनवतात. या व इतर वाचलेल्या पुस्तकावर प्रतिक्रिया घेण्यासाठी फाउंडेशन वर्षभर या मुलांच्या संपर्कात राहते. प्रकल्पाचे हे दुसरे वर्ष असून व्यक्तिगत आणि संस्थात्मक देणगीदारांच्या सहयोगातून हा प्रकल्प विनामूल्य राबविण्यात येतो. अधिक माहितीसाठी फाऊंडेशनच्या फेसबुक पेजवर संपर्क साधावा, असे आवाहन फाऊंडेशनने केले आहे.