
राष्ट्रवादीला जिल्ह्यात नंबर वन बनवा
gad26.jpg
महागाव : राष्ट्रवादी बुथ कमिटी आढावा बैठकीत शशिकांत शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राजेश पाटील, ए. वाय. पाटील, रामाप्पा करिगार, भिकू गावडे, बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
----------------------------------------------------------
राष्ट्रवादीला जिल्ह्यात नंबर वन बनवा
आमदार शशिकांत शिंदे : महागावात राष्ट्रवादी बुथ कमिटीची आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
महागाव, ता. २ : कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे. बुथ कमिटीच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास भविष्यात राष्ट्रवादी हा जिल्ह्यातील क्रमांक एकचा पक्ष बनेल, असा विश्वास माजी मंत्री तथा पश्चिम महाराष्ट्र विभागीय बुथ कमिटीचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
महागाव (ता. गडहिंग्लज) येथील अनिकेत मंगल कार्यालयात झालेल्या चंदगड मतदारसंघाच्या बुथ कमिटी आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार राजेश पाटील अध्यक्षस्थानी होते.
श्री. शिंदे म्हणाले, ‘सध्या निवडणुकांचे समीकरण बदलत आहे. लोकशाही विरोधी काम करणार्या पक्षाला कर्नाटकातील जनतेने जागा दाखवली आहे. त्याचे अनुकरण कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या चंदगड मतदारसंघातून होवून राज्यातही त्याची पुनरावृत्ती होईल. पक्षाचा कार्यकर्ता हा मुख्य घटक आहे. बुथ कमिटीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहचावे. बुथ कमिटीचे काम प्रभावीपणे झाल्यास राज्यातून पक्षाचा प्रत्येक आमदार ४० ते ५० हजार मताधिक्यांनी निवडून येईल.’
आमदार पाटील म्हणाले, ‘बुथ कमिटीने राष्ट्रवादीची भूमिका तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवावी. एक बुथ वीस युथ या संकल्पनेतून मतदारसंघात साडेसात हजारहून अधिक कार्यकर्ते तयार होतील. चंदगड मतदारसंघात आजअखेर राष्ट्रवादीने जागा राखली आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी ४०० कोटींचा निधी आणला असून भविष्यात पक्षाला बळकटी आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी बुथद्वारे कार्यरत रहावे.’
जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, अमर चव्हाण, अल्बर्ट डिसोझा यांची भाषणे झाली. शिवप्रसाद तेली यांनी स्वागत तर जयसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. बाजार समितीचे सभापती अभयसिंह देसाई यांनी आभार मानले. चंदगड मतदारसंघ राष्ट्रवादीचे अध्यक्ष रामाप्पा करिगार, बाबासाहेब पाटील, भिकू गावडे, मुकूंद देसाई आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------
लोकशाही जिवंत ठेवा
श्री. शिंदे म्हणाले, ‘इतर पक्षांतील आमदारावर राजकीय दबाव, सहकार क्षेत्रात कोंडी करण्यासह केंद्रातील यंत्रणाचा वापर करुन विरोधक लोकशाहीत फूट पाडत आहेत. देशाची समृद्ध लोकशाही जिवंत राहण्यासाठी नेते शरद पवार या वयातही काम करत आहेत. यामुळे आम्ही काय करायचे, हे पक्षाच्या सेनापतींनी ठरवावे. येणाऱ्या सर्वच निवडणुकांत लोकशाही विरोधकांना जनतेने जागा दाखवून द्यावी.’