
पहिल्याच दिवशी ४३० अर्जांची विक्री
पहिल्याच दिवशी ४३० अर्जांची विक्री
अकरावी विज्ञान केंद्रीय प्रवेश प्रक्रिया; ५१ विद्यार्थ्यांनी केले अर्ज जमा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला आजपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ४३० अर्जांची विक्री झाली. यातील ५१ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज जमा केले आहेत. येथील एम. आर. हायस्कूलवर १० जूनपर्यंत अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया चालणार आहे.
शहरातील सर्व आठ कनिष्ठ महाविद्यालयांच्या विज्ञान शाखेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. एम. आर. कनिष्ठ महाविद्यालय, साधना कनिष्ठ महाविद्यालय, संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालय, गडहिंग्लज कनिष्ठ महाविद्यालय, रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालय, क्रिएटिव्ह ज्युनिअर कॉलेज, साई इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज, मराठा कनिष्ठ महाविद्यालयाचा यामध्ये समावेश आहे. या महाविद्यालयात सहा अनुदानित तुकड्यांची ५२० इतकी प्रवेश क्षमता आहे. १२ विनाअनुदानित तुकड्यांची ९८० प्रवेश क्षमता आहे.
दरम्यान, आजपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला. प्रवेश अर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केली होती. एम. आर. हायस्कूलचा परिसर फुलून गेला होता. दिवसभरात ४३० अर्जांची विक्री झाली. यातील ५१ विद्यार्थ्यांनी आजच आपले अर्ज जमाही केले. अर्जांची विक्री एकाच केंद्रावरून केली जात आहे. मात्र, अर्ज स्वीकृतीसाठी प्रवर्गनिहाय केंद्र केली आहेत. तसेच अर्जाबाबत काही अडचण असल्यास मार्गदर्शनासाठी स्वतंत्र केंद्र उभारले आहे.