सांगा, आम्ही घरात रहायचे कसे?

सांगा, आम्ही घरात रहायचे कसे?

gad68.jpg
07508
गिजवणे : मुख्य मार्गालगतच्या घरे, दुकानांना खेटून संकेश्वर-बांदा महामार्गाची गटर्स उभारण्यात आली आहे. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
--------------------------------------
सांगा, आम्ही घरात रहायचे कसे?
रस्त्याकडेच्या कुटुंबांचा प्रश्न; संकेश्वर-बांदा महामार्ग आला उंबऱ्यालगत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम सुरु आहे. या कामामुळे रस्त्याकडेला असणाऱ्या गावात मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेक कुटुंबांच्या, व्यावसायिकांच्या उंबऱ्यालगत महामार्ग आला आहे. त्यात महामार्गाची उंची वाढलेली आहे. त्यामुळे दरवाजा उघडला की महामार्गाच्या गटर्सची भिंती समोर येत आहे. या परिस्थितीत घरात रहायचे कसे, व्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम पाच-सहा महिन्यापासून सुरु आहे. पहिल्या टप्प्यात संकेश्वर ते आजऱ्यापर्यंतचे काम हाती घेतले आहे. रस्त्यालगतची गावे वगळून काम सुरु केले होते. एका बाजूचे रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता रस्त्यालगतच्या गावाजवळील कामालाही सुरवात केली आहे. पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाला हात न लावता प्रथम गटर्सचे काम सुरु केले आहे. सध्या गिजवणेतील गटर्सचे काम सुरु आहे. या गावातील काही भागात रस्त्याची उंची वाढणार आहे. ही उंची लक्षात घेऊन गटर्सही उंच केले आहेत. काही ठिकाणी सध्याच्या रस्त्याची उंचीबरोबर गटर्सची खालील बाजू आहे. यावरुन गटर्सची उंची लक्षात येते.
मूळात रस्त्याकडेला असणाऱ्या घरालगत महामार्गाची गटर्स आली आहेत. त्यात गटर्सची उंची वाढली आहे. त्यामुळे घराचा दरवाजा उघडला की समोर अर्ध्या दरवाजाच्या उंचीला गटर्सची भिंत दिसत आहे. दरवाजा उघडून बाहेर येणेही अडचणीचे ठरावे अशी परिस्थिती आहे. मग, अशा घरात रहायचे कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे. मूळात महामार्गाचे काम सुरु झाले त्यावेळी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले होते. रस्त्याकडेच्या घरांचा मुद्दा उपस्थित केला होता. ही घरे महामार्गात बाधित होत नाहीत. पण, त्या घरात राहणेच मुश्किल व्हावे इतक्या जवळून महामार्ग जातो. संकेश्वर ते आजऱ्यापर्यंतची सहा गावे रस्त्यालगत येतात. या प्रत्येक गावात कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
-----------------
* शहरवासियांना धास्ती
संकेश्वर-बांदा महामार्ग गडहिंग्लज शहरातून जाणार आहे. पावसाळ्यात शहरातील महामार्गाचे काम करण्याचे नियोजन आहे. हे काम कशा पद्धतीने केले जाणार याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. रस्त्याची उंची वाढली, दुकान गाळ्यालगत महामार्ग आला तर काय याची शहरवासियांत धास्ती निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com