कोकण विकास प्राधिकरण स्थापणार

कोकण विकास प्राधिकरण स्थापणार

टीपः swt६२२.jpg मध्ये फोटो आहे.
७६५६
सावंतवाडी ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा येथे मंगळवारी नागरी सत्कार करताना युवराज लखमराजे भोसले. शेजारी राजन पोकळे व अन्य पदाधिकारी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

कोकण विकास प्राधिकरण स्थापणार
एकनाथ शिंदे ः सावंतवाडीत विविध प्रकल्पांचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः कोकण महाराष्ट्राची पर्यटन पंढरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी स्वतंत्र कोकण विकास नियोजन प्राधिकरण निर्माण केले जाईल. त्याद्वारे कोकणच्या विकासाला चालना मिळेल. जगाला हेवा वाटावा, असा समृद्ध कोकण घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. वैशिष्ट्यपूर्ण कारागिरांची भूमी म्हणून ओळख असणाऱ्या सावंतवाडी शहरातील कारागिरांच्या हाताला बळ देण्यासाठी इथल्या पारंपरिक कलेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
शहरातील पालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडई व शॉपिंग कॉम्प्लेक्ससह विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन शिंदे यांच्या माध्यमातून झाले. याप्रंसगी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘मंत्री दीपक केसरकर यांनी खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या योजना या ठिकाणी आणल्या. त्यांच्या प्रयत्नातून होणारी भाजी मंडई आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स सावंतवाडीच्या विकासाला चालना देणारे ठरेल. येथील व्यापाऱ्यांना हक्काचे व्यवसायाचे ठिकाण मिळणार आहे. गुरुवर्य रमाकांत आचरेकर पॅव्हिलियन इमारत व सावंतवाडी तालुका क्रीडा संकुल शहरातील नव्या खेळाडूंना प्रेरणा देणारे ठरेल यात शंका नाही. मुळात या अगोदर अशाप्रकारे एवढा मोठा निधी एकत्रितपणे कधीच मिळाला नव्हता. शिंदे-फडणवीस सरकार जनतेला न्याय देणारे आहे. त्यामुळे केसरकर यांनी केलेल्या सर्व पूर्ण केल्या आहेत.’
कोकणचा कायापालट करण्यासाठी केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून प्रयत्न करू. त्यासाठी स्वतंत्र कोकण विकास नियोजन प्राधिकरण निर्माण केले जात आहे. ‘वंदे भारत’मुळे कोकण पर्यटनाला फायदा होणार आहे. मुंबई-सिंधुदुर्ग हा वेगवान ग्रीनफिल्ड रस्ताही लवकरच मार्गी लागेल. महिला बचत गटांनाही प्राधान्य दिले आहे. महिलांना स्वावलंबनासाठी वेगळ्या योजना राबवण्यात येणार आहेत. आरोग्यसह पायाभूत सुविधा जनतेपर्यंत पोहोचवल्या जातील. मागच्या सरकारने ज्या-ज्या विकासकामांना स्पीड ब्रेकर आणले होते, ते सर्व स्पीड ब्रेकर बाजूला करून शिंदे-फडणवीस हे डबल इंजिन सरकार अती वेगाने काम करत आहे.’
ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आली आहे. आम्ही दावोस येथील जागतिक अर्थविषयक परिषदेसाठी गेलो त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव तेथे मोठ्या सन्मानाने घेतले जाते, हे पाहून अभिमान वाटला. पंतप्रधान मोदी यांचे आमच्या राज्यावर विशेष प्रेम असून आम्ही केंद्राकडे पाठविलेले सर्व प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यामुळेच केंद्राच्या माध्यमातून आमचे डबल इंजिन सरकार विकासाची घोडदौड करीत आहे.’
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, ‘नवीन उद्योग महाराष्ट्रात पर्यायने कोकणात यावे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. यापूर्वी विमानतळ, चौपदरीकरण, महामार्ग, रेल्वे गाड्या व अन्य पायाभूत सुविधा केल्या आहेत. आता कोकण पर्यटन स्थळ म्हणून जगासमोर यावे, असा मानस आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विविध योजना राबवून अनेकांच्या हाताला काम देऊन आत्मनिर्भर भारत घडवण्याचाही प्रयत्न असेल.’
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, आमदार भरत गोगावले, आमदार रवींद्र फाटक, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, नागरी सत्कार समिती अध्यक्ष युवराज लखमराजे भोसले आदी उपस्थित होते.


राणेंच्या माध्यमातून रोजगाराचे नवे दालन
श्री. राणे यांच्या एमएसएमई खात्याच्या माध्यमातून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली जाणार आहे. कालच आमची सुमारे तीन तास बैठक झाली. त्यात बेरोजगार युवक, महिलांसाठी विविध योजनांची त्यांनी विस्तृत माहिती दिली. या योजना राज्यात राबविण्यासाठी सरकारचा सर्वतोपरी प्रयत्न राहील. त्यासाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. आगामी काळात राणे यांच्या माध्यमातून रोजगाराची नवी दालने उभी राहणार आहेत. नोकरी देणारे हजारो हात निर्माण केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

युवराजांच्या हस्ते नागरी सत्कार
सत्कार समिती अध्यक्ष व सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोसले यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांचा नागरी सत्कार झाला. संत गाडगेबाबा भाजी मंडई संकुलाच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी नारळ फोडण्याचा मानही भाजपचे युवा नेते युवराज लखमराजे सावंत-भोसले यांनाच दिला. मुख्यमंत्री झाल्यानंतर सावंतवाडी शहरासाठी शंभर कोटींहून अधिक निधी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com