इच्छुकांचा तूर्तास राजकीय संन्यास

इच्छुकांचा तूर्तास राजकीय संन्यास

इचलकरंजी महापालिका वापरणे
-----------------------------
इच्छुकांचा तूर्तास राजकीय संन्यास
महापालिका निवडणुकीची अनिश्चीतता; लोकसभा, विधानसभेच्या चर्चेमुळे अस्वस्थता

पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १४ ः विविध राजकीय पक्षांकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने तयारी सुरु असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पक्षीय पातळीवर एक प्रकारे सातत्याने प्रचार कार्यक्रमांवर भर दिला जात आहे. त्यामुळे नगरपालिका, महापालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधी होणार याबाबत अनिश्चीतता निर्माण होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था की लोकसभा- विधानसभा निवडणूका प्रथम होणार याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क करण्यात येत आहेत. त्यामुळे वेगाने कामाला लागलेले इच्छुक आता पुढील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत तुर्तास ब्रेक घेण्याच्या तयारीत आहेत.
इचलकरंजी पालिकेची मुदत संपून सुमारे दीड वर्षे झाली. त्यानंतर लवकरच महापालिका होवून वर्षपूर्ती होत आहे. या कालावधीत प्रशासक राज्य आहे. या कालावधीत प्रशासनाच्या माध्यमातून कामकाज सुरु आहे. तथापि, सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे विकासकामांना अपेक्षित गती आलेली नाही. ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेचा घोळ अद्याप संपलेला नाही. तथापि, पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होतील, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु झाली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय पक्ष तसेच इच्छुक अधिक सक्रीय झाले होते. विविध उपक्रमांच्या माध्यमातून इच्छूक उमेदवार आतापासूनच संभाव्य मतदारांच्या संपर्कात जाण्यासाठी धडपडत होते. मुळचा राजकीय पिंड असणाऱ्या इच्छुकांनीही जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे हळूहळू राजकीय वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली होती.
मात्र काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबतची चर्चा थांबलेली दिसत आहे. त्याऐवजी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या चर्चेवर भर दिला जात आहे. त्यादृष्टीने प्रमुख राजकीय पक्षांनी विविध कार्यक्रम घेवून पक्षाच्या माध्यमातून केलेली विकासकामे, ध्येयधोरणे जनतेसमोर ठेवण्यास गतीने सुरुवात केली आहे. किंबहूना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आपापल्या मतदार संघातील संभाव्य उमेदवार कोण आणि कोणाशी लढत होईल, यावरच चर्चेचा जोर दिसत आहे. लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची महत्त्वाच्या शहरात वर्दळ वाढत आहे. इचलकरंजीसारख्या शहरात माजी खासदार राजू शेट्टी यांची विविध ठिकाणी जाणवत असलेली उपस्थिती चर्चेची ठरत आहे.
एकिकडे अशी परिस्थीती असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधी होणार याबाबत कमालीची अनिश्चितता आहे. लोकसभा- विधानसभा निवडणुकीपूर्वी या निवडणुका होणार काय, यावर चर्चेचा जोर राजकीय क्षेत्रातून दिसत आहे. मात्र लोकसभा - विधानसभा निवडणुकीबाबत विविध राजकीय पक्षांची पूर्वतयारी पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्यांची कोंडी होत आहे. बदलत्या राजकीय परीस्थितीचा अंदाज घेत इच्छुकांनी आपल्या कामांची गती कमी करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय क्षेत्रात पूर्णवेळ सक्रीय राहण्यापेक्षा तुर्तास तरी उद्योग- व्यवसायाकडे अनेकांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. इचलकरंजीत असे स्पष्ट चित्र सध्या दिसत आहे. एकूणच आगामी महापालिका निवडणुकीतील अनेक इच्छुकांची सध्या राजकीय संन्यास घेतल्यासारखी अवस्था झाली आहे.
-----
कार्यकर्त्यांचे काय?
बहुतांश निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये विशेष महत्व असते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तर कार्यकर्त्याला वेगळे स्थान असते. काही कार्यकर्ते तर पूर्णवेळ काम करीत असतात. पण इच्छुक उमेदवार तुर्तास थांबण्याच्या तयारीत असल्यामुळे कार्यकर्त्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
----
नागरिकांचे कामे रखडण्याची शक्यता
सध्या महापालिकेत सभागृह अस्तित्वात नाही. तथापि, इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते आपापल्या संभाव्य प्रभागातील नागरिकांचे छोटे-मोठे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रीय आहेत. त्यांची अधून - मधून महापालिकेत वर्दळ दिसत असते. पण इच्छुक उमेदवारच सक्रीय कामकाजापासून थांबले तर नागरिकांची छोटी- मोठी कामे थांबण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com