गांजाचा धूर...

गांजाचा धूर...

सहज विक्री, गांजा उत्पादनाचे धाडस
गडहिंग्लजला धुमसतोय धूर; हेब्बाळमधील गांजाचे कर्नाटकी कनेक्शन ?

अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : अलीकडील पाच वर्षापासून गडहिंग्लज शहरासह लगतच्या गावांमध्ये नशेसाठी गांजाची पाकीटे सहज उपलब्ध होत आहेत. पाकीटातील बियांचाच वापर उत्पादनासाठी केल्याने हेब्बाळमधील शेतकऱ्यांच्या उसात गांजा पिकला. या गांजाला कर्नाटकमधील साखळीचे कनेक्शन असल्याचा अंदाज आहे. स्थानिक मार्केट उपलब्ध होण्यासह विक्री सोपी झाली की कोणत्याही पिकाच्या उत्पादनाचे धाडस वाढते. हेच समीकरण गांजाला लागू पडत असल्याची चर्चा आहे.
गडहिंग्लजमध्ये यापूर्वी अनेकवेळा गांजा तस्करांवर कारवाई झाली. गांजाही जप्त केला. परंतु गडहिंग्लजपर्यंत गांजा कोठून आला, त्याचे कनेक्शन कुठपर्यंत आहे याचे पाळेमुळे खोदण्यात पोलिसांनी म्हणावे तितके गांभीर्य दाखवले नसल्याचे आजपर्यंतच्या कारवाईवरून दिसून येते. परिणामी, शहर परिसरात वारंवार गांजा येत राहिला. सुरुवातीला काही ग्रॅमच्या पाकीटात येणारा गांजा आता किलोने येत आहे. तेसुद्धा सर्रासपणे. कधी तरी टिप मिळते आणि पोलिस कारवाई होते. मात्र गांजा यायचा थांबलेला नाही. मोठी साखळीच यात गुंतल्याची चर्चा असली तरी त्याचे टोक गाठण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत नाही.
मध्यंतरी कोल्हापूर पोलिस गांजाचा तपास करताना पंढरपूरपर्यंत पोहोचले होते. तेथे गांजाचे गोदामच असल्याची चर्चा तेव्हा सुरु होती. त्यानंतर मात्र असा तपास झाल्याचे आठवत नाही. गांजाप्रकरणी प्रभावी तपासाचा अभाव आणि हातपाय पसरणाऱ्‍या तस्करामुळे आता थेट गांजा उत्पादनापर्यंतच मजल गेल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. आता तर गांजाची शेतीच करण्याचे धाडस तस्करांचे झाले आहे. पोलिस खात्याचा कमी झालेला धाक व गांजा व्यावसायिकांशी असलेले लागेबांधेच हेच गांजा तस्करांना प्रोत्साहन देणारे ठरत आहे. शहरात सर्रास गांजा येत असून तो सहजगत्या उपलब्ध होत असल्याने तरुणाईसुद्धा आहारी पडत आहे.
गडहिंग्लज शहर शैक्षणिक हब म्हणून नावारुपाला आले आहे. यामुळे परराज्यातील मुलेसुद्धा शहरात दाखल होत आहेत. पालकांचे दुर्लक्ष आणि स्थानिकला कोणाचेच नियंत्रण नसल्याचा परिणाम गांजाद्वारे नशा वाढण्यावर झाल्याचे सांगण्यात येते. नशेचे काही अड्डेच निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्याचाही शोध घेणे गरजेचे आहे. कर्नाटकात बहुतांश ठिकाणी गांजा सर्रासपणे उपलब्ध होतो. हेच कनेक्शन गडहिंग्लजपर्यंत पोहचल्याची चर्चा आहे. हेब्बाळ प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी ही साखळी शोधणे आवश्यक आहे. शहरात गांजा येताना हजारवेळा विचार व्हायला हवा, असा धाक पोलिसांनी निर्माण करण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
------------
कोठून मिळतात बिया ?
झाडांपासून मिळणारा ओला पाला वाळवून तयार होतो गांजा. वाळल्यानंतरच त्याचा वापर नशेसाठी केला जातो. गांजाची विक्री सोयीची व्हावी म्हणून त्याची छोटी पाकीटे तयार केली जातात. त्यात तोळ्यापासून काही ग्रॅमपर्यंत गांजा असतो. यामध्येच बियाही असतात. बिया तशाच टाकून वाळलेला पाला नशेसाठी वापरला जातो. अशा बियांचा वापर उत्पादनासाठी केला जात असल्याचा संशय पोलिसांचा आहे. दरम्यान, गडहिंग्लजपासून अवघ्या सात किलोमीटरवरील गावात गांजाच्या झाडांचा सुगावा ६५ किमीवरील कोल्हापूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाला लागला. मात्र स्थानिक पोलिसांचा त्याचा थांगपत्ता लागला नाही, हा सुद्धा चर्चेचा विषय झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com