मनपा राष्ट्रवादी स्थिती

मनपा राष्ट्रवादी स्थिती

(महापालिका लोगो आवश्‍यक)

राष्ट्रवादीला शोधावे लागणार खमके नेतृत्व
कोल्हापूर, ता. ३ ः महापालिकेच्या राजकारणात महाडिकांच्या सत्तेला आव्हान देत सत्ता मिळवणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला अजित पवारांच्या फुटीमुळे आगामी निवडणुकीत नेतृत्व शोधावे लागणार आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये एकतर्फी सत्ता मिळली नसली तरी राष्ट्रवादीचे महत्त्‍व निर्माण करण्यात मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाटा मोठा होता. आता तेच दुसऱ्या गटात गेले आहेत. त्यामुळे नेतृत्व कोणाकडे यावर राष्ट्रवादीची वाटचाल ठरणार आहे. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट एकत्र लढल्यास आगामी निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेसची दमछाक होईल.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात पक्षाचे वारे जोरात होते. २००० मधील महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाने दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली चाचपणी केली. त्यात फारसे यश आले नव्हते. महाडिकांच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी मित्रपक्षाची गरज आहे हे मुश्रीफांनी जाणले व २००५ मध्ये विनय कोरेंच्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या मदतीने महापलिकेच्या निवडणुकीत पक्षाने नारळ फोडला. त्यानंतर आमदार सतेज पाटील मुश्रीफांसोबत जोडले गेले. २०१५ च्या निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीला रोखण्यासाठी या दोघांनी सत्ता मिळवली. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्तेचे मुश्रीफ व सतेज पाटील यांनी नेतृत्व केले. महापौर, उपमहापौर, स्थायी तसेच इतर समितींच्या निवडणुकीत त्यांनी वजन निर्माण केले.
महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवार शोधण्यापासून त्याला ताकद देण्याचे काम मुश्रीफांनी केले. त्यामुळे गेल्या सभागृहात १४ नगरसेवक निवडून आले. त्यांना राज्य सरकारकडून विकास निधी मिळवून देण्याचेही काम केले. अनेक माजी नगरसेवक मुश्रीफांचे नेतृत्व मान्य करणारे असल्याने कितीजण थांबतात हे पहावे लागणार आहे. कदाचित दिवाळीदरम्यान निवडणूक लागली तर भाजपकडून खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर तर अजित पवार गटातून आमदार हसन मुश्रीफ असतील. त्यांना तोंड देत ताकद दाखवून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेतृत्वासाठी तितका खमक्या नेता लागणार आहे.

चौकट
इच्छुकांत संदिग्धता
शिवसेनेत दोन गट, आता राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने इच्छुकांमध्ये कोणाकडे जायचे याची संदिग्धता निर्माण होईल. इतक्या पक्ष, गटांमुळे कोणाची ताकद जिंकून येण्यासाठी पुरेशी आहे याचा अभ्यास करावा लागणार आहे. निवडणुकीत महाविकास आघाडी तसेच भाजपची शिंदे, अजित पवार गटाची आघाडी म्हणून लढणार की वेगवेगळे लढणार हेही पहावे लागेल. त्यामुळे इच्छुकांकडून आतापर्यंत बांधलेली सारी समीकरणे सध्या तरी विस्कटली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com