गडहिंग्लज पाणी योजनेची फेरनिविदा काढण्याचे आदेश

गडहिंग्लज पाणी योजनेची फेरनिविदा काढण्याचे आदेश

Published on

गडहिंग्लज पाणी योजनेची
फेरनिविदा काढण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : केंद्र शासनाच्या अमृत योजनेतंर्गत शहरासाठी मंजूर झालेल्या पाणी योजनेची फेरनिविदा काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
शहरासाठी ४६ कोटींची पाणी योजना मंजूर आहे. त्याची ई-निविदा प्रक्रिया झाली होती. परंतु या निविदेत २ लाख ३० हजार लिटर असा उल्लेख होण्याऐवजी २३ लाख लिटर पाण्याची टाकी बांधण्याची क्षमता असलेल्या ठेकेदारांनी निविदा भरण्याची अट घातली होती. टंकलेखनामध्ये ही चूक झाल्याचे मुख्याधिकारी खारगे यांनी स्पष्टही केले होते. परंतु, या चुकीच्या अटीमुळे अनेक ठेकेदारांना ही निविदा भरता आली नसल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी केली होती. तसेच योजनेच्या कामाची फेरनिविदा काढण्याची मागणीही त्यांनी केली होती.
दरम्यान, जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने पालिकेकडून लेखी अहवाल मागवला होता. त्यातील निविदा प्रक्रियेच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आणि टंकलेखनातील या चुकीमुळे योजनेची फेरनिविदा काढण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्‍यांनी केली आहे. या आदेशानुसार आता योजनेच्या कामाची पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना लवकरात लवकर शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका कटीबद्ध असून यासाठी सर्वांनी नव्या योजनेच्या पुर्णत्वासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. खारगे यांनी पत्रकातून केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.