लाचखोर शिक्षण सहसंचालक - फॉलोअप

लाचखोर शिक्षण सहसंचालक - फॉलोअप

Published on

लाचखोर कठरे, गुरव, जोंगला
एक दिवस पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः लाचखोर शिक्षण सहसंचालकासह, स्टेनोग्राफर आणि कनिष्ठ लिपिकाला आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायाधीशांनी एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शिक्षण सहसंचालक हेमंत नाना कठरे (वय ४६, सध्या रा. अंबाई डिफेन्स, कोल्हापूर, मूळ रा. पाचवड, ता. खटाव, जि. सातारा), स्टेनोग्राफर प्रवीण शिवाजी गुरव (वय ३२, सध्या रा. पीरवाडी, ता. करवीर, मूळ रा. महमंदापूर, ता. भुदरगड) आणि अनिल दिनकर जोंग (वय ३४, रा. राशिवडे, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत.

हॉटेल मॅनेजमेंटचे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी काल त्यांना तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात शिक्षण उपसंचालक (उच्च शिक्षण) हे कार्यालय आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे तीन जिल्हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील एक संस्थाचालकांना कॉलेजमध्ये सर्व सोयी-सुविधा असल्याचा अहवाल देण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली. या कार्यालयातून अनेक प्रस्ताव पुढे जातात. अनेक कामामध्ये या कार्यालयाकडून अभिप्राय घ्यावे लागतात. त्याचाच फायदा घेऊन येथे लाचखोरीचा प्रकार चालत असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे आजपर्यंत अन्य कोणाची अशी पिळवणूक झाली आहे काय? त्यातून येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे ज्ञात-अज्ञात मालमत्ता आहे काय, याचाही तपास होत असल्याची माहिती उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिली आहे.

चौकट
तिघांच्याही घरांची झडती
दरम्यान, लाचखोर तिघांच्याही घरांची झडती घेतली आहे. मात्र, त्यामध्ये अद्याप तरीही कोणताही इतर किंवा उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता आढळलेली नाही. संशयित आरोपींना मिळालेल्या पोलिस कोठडीत त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.